Pune : ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना करा – जिल्हाधिकारी डुडी

पुणे – शहरासह ग्रामीण भागात वारंवार अपघात (ब्लॅकस्पॉट) होणारी एकूण 42 ठिकाणे आहेत. सुरक्षतितेच्या दृष्टीने या ठिकाणी लघुकालीन, तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. अशा ठिकाणी जाण्यास प्रतिबंध किंवा ठराविक कालावधीसाठी निर्बंध, दिशादर्शक फलक लावणे, राडारोडा साफ करणे, बॅरिकेटींग आदी उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अपघाताची ठिकाणनिहाय कारणे शोधून सर्व संबंधित विभागांना सुरक्षात्मक सूचना कराव्यात, याचे पालन सर्व संबधितांनी करावे. खडकवासला धरण चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करा, अशा सूचना करून रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी निधी उपलब्ध करून देऊ, असेही डुडी यांनी सांगितले.
अहवाल सादर करा
पुणे महापालिका हद्दीत 15 ठिकाणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 22, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 2, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ 1 आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत 2 असे एकूण 42 ब्लॅकस्पॉट आहेत. त्यांची पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी करून येत्या एक महिन्यात अहवाल सादर करावा, असे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले.



