Pune : झाडणकामासाठी दुप्पट कर्मचारी तरी कचरा पडूनच
Pune : पुण्यातील दत्तवाडीच्या जुन्या रस्त्यावर आठ दिवसांपासून कचरा आणि मैला पाणी साचले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली.

Pune : दत्तवाडीतील जुन्या रस्त्यावर गेल्या आठवड्यापासून कचरा उचलला न गेल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. रस्त्याच्या कडेला मैला पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेकडून शहरात झाडणकाम करण्यासाठी तब्बल ९ हजार खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असतानाही ऐन उत्सवाच्या काळात आठ दिवसांपासून कचरा पडून असल्याने महापालिका प्रशासनाच्या स्वच्छता यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दत्तवाडीतील जुन्या रस्त्यावर गेल्या आठवड्यापासून कचरा पडून आहे. कचरा न उचलल्याने त्याचे ढीग वाढत असून, त्यातच मैला पाणी साचल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिकेकडून झाडणकामासाठी कर्मचारी आणि यंत्रणा उपलब्ध असतानाही प्रत्यक्षात रस्त्याची स्वच्छता होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचा मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपाला तिन्ही बाजूंनी कचरा आणि मैला पाण्याचा विळखा पडला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी नागरिक आणि भाविकांची वर्दळ वाढणार असताना अशी परिस्थिती कायम राहिल्यास आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
झाडणकाम कर्मचाऱ्यांकडून नियमित स्वच्छता केली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो; मात्र दत्तवाडीतील परिस्थिती या दाव्याला छेद देणारी आहे. “डोळे घट्ट मिटून झोपलेल्या प्रशासनाला जाग तरी कधी येणार?” असा सवाल नागरिकांनी केला आहे. दरम्यान, परिसरातील कचरा आणि मैला पाणी तातडीने हटवून स्वच्छता करण्यात यावी, अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दत्तवाडीतील नागरिक अविनाश खंडारे यांनी दिला आहे.





