Pune : स्वारगेट स्थानकाची सुरक्षा रामभरोसे; नादुरुस्त बसेसमध्ये अनैतिक कामे?

पुणे – स्वारगेट एसटी स्थानक चोरी, पाकिटमारी, ट्रॅव्हल एजंट आणि फिरस्त्यांच्या सुळसुळाटामुळे नेहमीच चर्चेत असते. आता शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे ते राज्यभर चर्चेत आले आहे. एकंदरच येथील सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता, प्रवाशांचा प्रवास सुखकर नसल्याचे, तसेच स्थानकाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावरच असल्याचे दिसते आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज चोरून नेण्याच्या एकापाठोपाठ पाच ते सहा घटना घडल्या होत्या. एसटी स्थानकाच्या आवारात प्रवाशांच्या पिशवीतून दागिने, तसेच मोबाइल चोरीच्या घटना कायम घडत असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. एसटी स्थानकाच्या आवारातील चोरी, तसेच गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त घालण्याची गरज आहे.
एसटी महामंडळाची स्वत:चीही सक्षम सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र एवढ्या घटना घडूनही काही हालचाली झलेल्या दिसत नाहीत. एसटी स्थानकाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही पुरेशी नाही. मग प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल काय बोलणार?
बसमध्ये कंडोमची पाकिटे
स्वारगेट बस स्थानकाच्या आवारामध्ये ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती दिसते. अनेक बेघरांनी स्वारगेट स्थानकालाच आपले घर बनविले आहे. दरुडे आणि गर्दुल्यांचही येथे ठीय्या असतो. अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्याही पडलेल्या दिसतात. त्यासंदर्भात काहीही कारवई झाल्याचे दिसत नाही.
उलट या लोकांचा सकाळी आणि रात्री प्रवशांना त्रास होताना दिसतो. त्यातच स्थानकाच्या आवारात काही नादुरुस्त बस लावण्यात आलेल्या आहेत. या बसमध्ये चक्क कंडोमची पाकिटे आणि अंतर्वस्त्र पडलेली आढळून आली आहेत. मग या प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
या संदर्भात विचारले असता, स्वारगेट बसस्थानकात २४ तासात १६०० बस ये-जा करतात. येथे तीन शिफ्टमध्ये २३ सुरक्षा रक्षक काम करतात. तर सुरक्षेसाठी २४ कॅमेरे बसविण्यात आले असून, त्याचे नियंत्रण कक्ष आगार प्रमुखांच्या कार्यालयात आहे. वाहतूक नियंत्रकही २४ तास उपस्थित असतात.
घटना घडली तेव्हा स्थानकावर प्रवाशांची वर्दळ होती. ही घटना लक्षात घेता आम्ही सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणार आहोत. तसेच येथे पोलिसांनाही गस्त वाढविण्याची विनंती करणार असल्याचे विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितले.
विशेष गस्ती पथक गायब
स्वारगेट एसटी स्थानकावरील महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांच्या सुरक्षेच्या दुष्टीने तात्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एक विशेष गस्ती पथक तयार केले होते. यामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक आणि तीन ते चार अंमलदारांचा समावेश होता. बस स्थानकात रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या तसेच प्रवास करुन आलेल्या महिलांना सुरक्षा पुरविण्याचे काम हे पथक करत होते. मात्र गुप्ता यांची बदली होतात स्वारगेट पोलिसांच्या पथकाने गाशा गुंडाळला.
स्वारगेट एसटी स्थानक नेहमी गजबजलेले असते. येथे २४ तास प्रवाशांची वर्दळ असते. बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना रिक्षा चालक, ट्रॅव्हल एजंट आणि फिरस्त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. यातच महिला आणि ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना अशा घटकांकडून मोठा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन स्वारगेट पोलीस ठाण्याअंतर्गत बालस्नेही कक्ष आणि महिला सुरक्षा अंतर्गत हे पथक तयार करण्यात आले होते.
पोलिसांच्या नियमीत गस्ती व्यतिरीक्त हे पथक विशेष जबाबदारी पार पाडत होते. हे पथक रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कार्यरत होते. विशेषतः पहाटे परगावावरुन आलेल्या एकट्या दुकट्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना रिक्षा मिळवून देण्यास ते सहाय्य करायचे. रिक्षा चालकाचा आणि प्रवाशांचा नंबर ते टीपून घ्यायचे. प्रवाशी घरी पोहचे पर्यंत फोनवरुन संपर्कात रहायचे. मुजोर रिक्षा चालकांना लगाम लावण्यासही पथकाला यश आले होते. अनेक प्रवाशांकडून पथकाचे आभार मानले जात होते. महिला पोलीस उपनिरीक्षक आर.आर.पाटील पथकाच्या प्रमुख होत्या. हे पथक पुन्हा कार्यरत करण्याचे वेळ आता आली आहे.
राजकीय पक्षाकडून तोडफोड
शिवशाही बसमधील अत्याचाराच्या घटनेने पुणे शहर हादरले असतानाच, घटनास्थळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी एसटी स्थानकात सुरक्षा रक्षक केबीनची तोडफोड केली. तसेच इतरही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्थानकात आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्थानकात भेट देऊन अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील उपस्थित होत्या.





