Pune : स्वामी विवेकानंदांचे विचार भारताला विश्वगुरू बनवू शकतात – अविनाश धर्माधिकारी

पुणे : युवकांच्या सशक्ततेचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार,आणि शाश्वत मूल्यांचा पुनरुज्जीवन हे स्वामी विवेकानंदांचे विचार भारताला विश्वगुरू बनवू शकतात असे प्रतिपादन निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
भारतीय संस्कृती संगम, पुणे आणि आयडियल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात धर्माधिकारी यांनी स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत या विषयावर आपले विचार मांडले. जिजाऊंनी महाराष्ट्राला भारतासाठी लढायला शिकवले, तर स्वामी विवेकानंदाने आपल्या विचारांद्वारे भारतीय समाजाला आणि जगाला एक नवा दृष्टिकोन दिला,असे ते म्हणाले.
भारताची खरी ताकद तिच्या युवा पिढीत आहे, जिने ऊर्जा,आदर्श आणि नैतिकतेच्या आधारे सामाजिक बदल आणि राष्ट्रीय प्रगती घडवू शकते. विवेकानंद यांनी प्रत्येक समस्येचा सामना करतांना विज्ञानात्मक दृष्टीकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन एकत्रितपणे वापरले. त्यांचे विचार आजही अत्यंत प्रासंगिक असून, स्वामीजींच्या शिकवणीतील प्रत्येक क्षेत्रावर केलेले निरीक्षण अनमोल आहे, असे धर्माधिकारी यांनी नमूद केले. अविनाश धर्माधिकारी यांचे मत आहे की,आजकाल आपल्या स्वयं-घोषित ‘पुरोगामी’ धोरणनिर्मात्यांना पाश्चात्य विचारवंतांचे संदर्भ देण्याची आवड असली तरी,ते आपल्या देशातील महान विचारवंतांकडून शिकण्यास कधीही तयार नसतात, अशी खंत धर्माधिकारी यांने व्यक्त केली.
विवेकानंदांनी भारतीय तत्त्वज्ञानात विरोधाभास नसून, त्याच तत्त्वज्ञानाचे वेगवेगळ्या पद्धतीने दर्शन घडवले. त्यांनी अध्यात्माला समाजसेवेच्या कार्याशी जोडले आणि भारत राष्ट्र म्हणून विकसित होण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली, असे महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी म्हटले. डॉ. ऋचा पंडित यांनी हे वीर विवेकानंद … हे वैयक्तिक गीत गायले, सांगता मधुरा वैशंपायन यांनी गायिलेल्या संपूर्ण वंदे मातरम ने झाली.




