Pune : चिकनगुनिया, डेंग्यू रोखण्यात यश; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा

पुणे – शहरात २०२५ मध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांची साथ आटोक्यात आणण्यात महापालिका आरोग्य विभागाला यश मिळाले आहे. २०२४ मध्ये डेंगीचे ३८२, चिकुनगुनियाचे ४८३ आणि मलेरियाचे ५ रुग्ण आढळले होते.
मात्र, यंदा जूनअखेरपर्यंत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे प्रत्येकी फक्त ८, तर मलेरियाचा एकही रुग्ण नोंदवलेला नाही.आरोग्य विभागाच्या कीटक प्रतिबंधक मोहिमेमुळे हे यश मिळाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. नोव्हेंबर २०२४ पासून ही मोहीम राबवण्यात आली असून, यामध्ये डास उत्पत्ती रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
अशा उपाययोजना
– १८१ केंद्रांमध्ये गप्पी मासे पैदास करून २५१८ ठिकाणी सोडले.
– डास उत्पत्ती स्थळांवर नियमित फवारणी, पाटबंधारे व पर्यावरण विभागांच्या मदतीने जलपर्णी काढण्याचे काम.
– मलेरिया आणि डेंगी दिनानिमित्त प्रभात फेरी, फलक, हस्तपत्रके यांतून जनतेमध्ये जनजागृती.
– कंटेनर सर्वेक्षणात डास उत्पत्ती आढळल्याने ८१४ ठिकाणी नोटिसा व रु. ९६,३०० दंड आकारणी.
– मागील तीन वर्षांत रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागांवर विशेष लक्ष.
“एडिस इजिप्ती डासाची पैदास घरातील पाणीसाठ्यात होत असल्याने नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत, डास प्रतिबंधक मलमांचा वापर करावा व दिवसा झोपताना मच्छरदाणी वापरावी.” – एम. जे. प्रदीप चंद्रन (अतिरिक्त आयुक्त)





