Pune | स्वत:चे पैसे मिळण्यासाठी तब्बल २६ वर्षे संघर्ष; ज्येष्ठ दाम्पत्याला दिलासा

पुणे – स्वत:च्याच मुदतठेवीची रक्कम मिळण्यासाठी पुण्यातील वृद्ध दाम्पत्याला नाहक त्रास सहन करावा लागला. ग्राहक हितरक्षणाय फाउंडेशनच्या कार्यालयात या ज्येष्ठ दाम्पत्याने लेखी तक्रार केल्यानंतर फाउंडेशनने पुणे पीपल्स बँकेला सूचना पत्र पाठवून “मुदत ठेवीची रक्कम मुदत कालावधी पूर्ण होऊनही परत केली नाही.
आपण दूषित सेवा दिलेली आहे. ही रक्कम परत न केल्यास ग्राहक कायद्यांतर्गत कारवाई होईल,’ असे सूचित केले अखेर बँकेने ज्येष्ठ ठेवीदारांना २६ वर्षांनंतर पत्र पाठवून मुदत ठेवीची रक्कम व्याजासहित परत केली.
आंबेगाव बुद्रुक येथे राहणऱ्या विनायक पवार व मीरा पवार या ज्येष्ठ दाम्पत्याच्या बाबतीत हा प्रकार घडला. त्यांच्या वतीने ग्राहक हितरक्षणाय फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. महेंद्र दलालकर यांनी बाजू मांडली. मीरा पवार यांनी त्यांच्या उतार वयात आर्थिक आधारासाठी पुणे पीपल्स को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बिबवेवाडी शाखा यांच्याकडे १९९८ मध्ये ४० हजार रुपयांची मुदत ठेव ठेवली होती.
ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे त्यावर व्याजासहित रक्कम संबंधित ठेवीदाराला देण्याची कायदेशीर जबाबदारी ही बँकेची असते. परंतु पुणे पीपल्स बँकेने मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही सबंधित ठेवीदारास कोणतीही माहिती कळविली नाही. पवार दाम्पत्याला त्यांच्या उतार वयात बँकेच्या दूषित सेवेचा त्रास सहन करावा लागला. पवार यांना आपली मुदत ठेव बँकेत लक्षात आल्यानंतर त्यांनी पुणे पीपल्स बँकेला मुदत ठेवीची रक्कम व्याजासहित परत करण्याची लेखी विनंती केली.
परंतु बॅंकेने मुदत ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे विनायक पवार यांनी ग्राहक हितरक्षणाय फाउंडेशन येथील कार्यालयात लेखी तक्रार दिली. या तक्रारीनंतर फाउंडेशनने बँकेला सूचना पत्र पाठविले आणि ही रक्कम परत न केल्यास ग्राहक कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे सूचित केले. त्या पत्राची दखल घेत ज्येष्ठ दाम्पत्याला २६ वर्षानंतर मुदत ठेवीची रक्कम परत केल्याची माहिती ग्राहक हितरक्षणाय फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. महेंद्र दलालकर यांनी दिली.




