पुणे : पुलांच्या स्ट्रक्चरल अॉडिटचे काम संथगतीने

पुणे – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सध्या, एकूण 16 हजार 519 लहान-मोठे व ब्रिटीशकालीन पूल आहेत. यापैकी 451 पुलांचे स्ट्रक्चरल अॉडिट करण्यात आले आहे. मागील 10 वर्षांत 1693 पुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत असले तरी उर्वरीत १४ हजार ३७५ पुलांचे काय, त्यांचे स्ट्रक्चरल अॉडिट किंवा दुरूस्ती केंव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यातील प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग यांची दैनंदिन देखभाल व वेळोवेळी दुरुस्ती करून हे रस्ते वाहतुकीसाठी योग्य राहावेत, यासाठी विभाग सतर्क असल्याचे सांगितले जाते. अतिवृष्टीमुळे पाण्याखाली जाणाऱ्या पुलांवर खबरदारीचा उपाय म्हणून सावधानतेचे फलक लावण्यात येत असून, दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतुकीसाठीचे पर्यायी मार्ग योग्य स्थितीत ठेवण्याच्या सूचना सर्व अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
धोकादायक स्थितीत असलेल्या किंवा वाहतुकीसाठी बंद असलेल्या पुलांच्या दोन्ही बाजूंना सावधानतेचे फलक व बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत, अशा रस्ते व पुलांची स्थिती शासन स्तरावरून सातत्याने तपासली जात आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर वेळीच उपाय करता यावा, यासाठी एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात आली असून, त्याअंतर्गत अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.





