Pune: शहरात अद्यापही संमिश्र वातावरण; दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री थंडी…

पुणे – शहरासह जिल्ह्यात थंडीचा लपंडाव सुरू असून अद्यापही संमिश्र वातावरण आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री थंडी असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचा जोर कमी-अधिक झाला आहे. काल (दि. १०) दिवसभर उन्हाचा चटका आणि अधून-मधून ढगाळ वातावरण होते.
तीन दिवसांपूर्वी १३ अंशापर्यंत खाली आलेल्या किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली. तर कमाल तापमानही ३० अंशाच्या पुढे गेले. मात्र, शहराच्या पश्चिम भागातील एनडीए, पाषाण, कोथरूड, वारजे, बावधन, औंध, धायरी, आंबेगाव, कात्रज याठिकाणी थंडी चांगली जाणवत असून, अन्य परिसरात हलकासा गारवा जाणवत आहे.
रविवारी (दि. १०) दिवसभर उन्हाचा चटका तर मधूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सातनंतर हवेत गारवा पसरल्यामुळे बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. दरम्यान, पुढील चार दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. तर काही भागात धुके पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.





