Pune: टॉवरवरील रिमोट रेडीओ युनीटची चोरी करणारा जेरबंद; ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे – मोबाईल टॉवरवर ४ जी नेटवर्कसाठी बसविलेले महागडे रिमोट रेडीओ युनीट चोरी करणाऱ्या एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ५ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिलशाद मोहमद रफिक (वय ३२, रा. खडी मशिन चौक, कोंढवा, मुळ. रा, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या गुह्यात यापूर्वी अक्षय शांताराम बोडके (वय २६), अशिष अशोक शिंदे (वय ३९, दोघे, रा. बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आलेली होती. तर, रफिक हा फरार होता. याबाबत सागर मोरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे हे काम करीत असलेल्या कंपनीने धनकवडी व साई कृपा सोसायटी, सहकारनगर येथे टॉवर बसवले होते. या टॉवरवर एका मोबाईल कंपनीने ४ जी नेटवर्कसाठी रिमोट रेडीओ युनीट बसविले. एकूण ९ मशिन्स होत्या. मात्र, मार्च महिन्यात चोरट्यांनी टॉवरवर बसवलेले युनिट चोरून नेले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांत पोलिसांनी बोडके आणि शिंदे यांना अटक केली होती. तेव्हापासून रफिक हा फरार होता.
दरम्यान दहिहंडी सणानिमीत्त सहकारनगर पोलीस पेट्रोलींग करीत होते. यावेळी एकजण के. के. मार्केट येथील भंगार दुकानाजवळ चोरीच्या रिमोट रेडीओ मशीन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार सागर सुतकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रफिकला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने साथीदार बोडके, शिंदे यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर पाटील, बापु खुटवड, सागर सुतकर, खंडु शिंदे, अमोल पवार, महेश मंडलिक, सागर कुंभार, अमित पदमाळे, विशाल वाघ यांनी ही कारवाई केली आहे.





