पुणे : एसटीची सेवा पूर्ववत होण्याच्या मार्गावर

पुणे –महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) हजारो कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबरपासून संपावर असल्याने एसटीच्या अत्यल्प बसेस धावत आहेत. मात्र, आता कर्मचारी हजर होण्यास सुरुवात झाली आहे. कर्मचाऱ्यांना नुकत्याच दिलेल्या अल्टीमेटमनंतर सुमारे 70 कर्मचारी हजर झाले आहेत. तर, सध्या पुणे विभागातून 125 मार्गांवर बसेस धावत असून, बससेवा पूर्ववत होण्यास सुरुवात होत असल्याचे चित्र आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्याच्या दुर्गम भागातील मार्ग बंदच आहे.
संपातील कर्मचाऱ्यांना हजर होण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत होते. मात्र, अद्यापही पुणे विभागात संप सुरूच आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत रुजू होण्याचा अल्टीमेटम दिला होता. तर, त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे पवारांनी म्हटले होते. त्यानंतर कर्मचारी हजर होण्यास सुरूवात झाली असली तरी, आम्ही संपाबाबत ठाम आहोत. कोर्टाच्या निकालानंतर एप्रिल महिन्यात निर्णय घेण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
सध्या बिदर, गुलबर्गा, विजापूर या आंतरराज्य मार्गांसह उस्मानाबाद, उमरगा, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद आदी लांब पल्ल्याच्या मार्गांवर बससेवा सुरू झाली आहे. मात्र, ग्रामीण भागामध्ये अद्यापही नागरिकांना पायी किंवा खासगी वाहनांनी प्रवास करणे हेच पर्याय उपलब्ध आहेत.
याचा विद्यार्थ्यांना फटका बसत असून, काही किलोमीटर चालत रोज शाळा, महाविद्यालये गाठावी लागत आहेत. विभागाचे उत्पन्नदेखील 1.45 लाखांहून अधिक झाले आहेत. संपात सहभागी सुमारे 1 हजार 250 कर्मचारी हजर आहेत. यामध्ये 450 चालक, वाहकांचा समावेश असून, त्यापैकी सुमारे 100 चालक कंत्राटी आहेत.
आजही पुणे विभागातील अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. आमचा कोर्टाच्या निर्णयावर विश्वास आहे. 5 एप्रिलला आम्ही भूमिका स्पष्ट करू. – राजेंद्र मेश्राम, स्वारगेट आगार
सध्या कर्मचारी हजर होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने चालक, वाहक, मेकॅनिक हजर होत आहेत. जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, भोर, दौंड आगारांतर्गत विविध गावांमध्ये सेवा सुरू झाली आहे. येत्या काळात कर्मचारी हजर होतील, त्यानुसार जिल्ह्यातील सेवादेखील सुरू करण्यात येणार आहे. – ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक नियंत्रक, पुणे विभाग





