सरयु – तीरावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी,
त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर,
मधुन वाहती मार्ग समांतर,
रथ, वाजी, गज, पथिक चालती,
नटुनी त्यांच्यावरी ….
घराघरावर रत्नतोरणें
अवती भवती रम्य उपवनें
त्यांत रंगती नृत्य गायने
मृदंग वीणा नित्य नादती,
अलका नगरी परी…
आधुनिक वाल्मिकी असा सन्मान मिळवलेल्या ग. दि. माडगूळकर यांनी गीतरामायणात रचलेल्या उपरोक्त ओळी सोमवारीखर्या अर्थाने सार्थ झाल्या. असेच दृश्य अयोध्येसह संपूर्ण देशभर होते. साहजिकच संतांची नगरी, सांस्कृतिक मांदियाळी असलेले पुणे शहरदेखील त्यात सहभागी होते. शहरासह उपनगरांत श्रीरामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला.
यानिमित्त संपूर्ण शहर भगवेमय, राममय झालेले पहायला मिळाले. तर, रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी, घरोघरी दीपोत्सव साजरा करत जणू दिवाळीची अनुभूती पुणेकर घेत होते. सोमवारी सकाळपासूनच घरोघरी, गल्लोगल्ली पताका तोरणे उभारण्यात आली होतीच. याशिवाय पारंपरिक पोषाखात हा सोहळा सणाप्रमाणेच, मोठ्या उत्साहात, आनंदात हा दिवस साजरा करण्यात आला. प्रसाद वाटप, शोभायात्रा, गीतरामायण, अन्य नव गायकांनी गायलेली गाणी या सगळ्यांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते.
अयोध्येतील सोहळा अनेक मंडळांनी, दुकानदारांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी एलईडी स्क्रीनवर लाइव्ह दाखवला. तेथे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला आणि शहरात जल्लोषाला सुरूवात झाली. फटाक्यांची आतषबाजी, शोभायात्रा काढण्यात आल्या. अनेकठिकाणी साखर वाटण्यात आली, तर लाडू, प्रसादचे ताट, होम हवन, याग, आरत्या, शंखनाद, ढोलताशा वादन या सगळ्यांनी संपूर्ण शहरच निनादून गेले.
श्रीरामाचा गजराने निनादले पुणे…
संपूर्ण शहरभरात सकाळपासूनच राममय वातावरण होते. संपूर्ण शहर भगवे झाले होते. भगव्या टोप्या, उपरणे, नटूनथटून तयार झालेला महिला वर्ग, बाळगोपाळ शोभायात्रेत सहभागी झाला होता. यावेळी संपूर्ण शहर रामनामाच्या गजरात निनादून गेले. सकाळी शोभायात्रा काढल्याच परंतु सायंकाळीही शोभायात्रा काढण्यात आली. तसेच मंदिर, सोसायटी अनेक ठिकाणी दीपोत्सव करण्यात आला.
अयोध्येहून लाइव्ह टेलिकास्ट
ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावून लाइव्ह टेलिकास्ट दाखवले जात होते. मूर्तीची पहिली छबी पाहिल्यावर प्रत्येकाच्या ओठी मूर्तीचे कौतुक आणि भावूक होऊन डोळ्यांत पाणी तरळले. रामलल्लाच्या मूर्तीतील ते बालकाचे निरागस भाव अनेकांच्या मनाचा ठाव घेत होते आणि प्रत्येकाच्या तोंडून वाह…असेच उद्गार बाहेर पडत होते.
दुकानांसमोर भगवे ध्वज, रामाची गाणी
गल्लोगल्ली, चौकांमध्ये छोटे स्टेज टाकून रामाच्या मूर्ती, प्रतिमा कट आऊट उभारून अनेकांनी रामभक्ती दर्शवली. या परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी, दुकानांसमोर भगवे ध्वज लावण्यात आले होते, तर साऊंड सिस्टिम्स लावून त्यावर रामाची गाणी वाजवली जात होती. त्यामुळे वातावरण मंगलमय झाले होते.
लहान मुलांना विशेष वेशभूषा
यावेळी मंदिर, संघटना, मंडळे, संस्था यांनी लहानमुलांना राम, लक्ष्मण आणि सीतेची ड्रेपरी घालून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. रामलल्लाच्या स्वरूपात ही मूर्ती विराजमान केल्याने लहानमुलांनाच ड्रेपरी घालून बालस्वरूप दाखवण्याचा प्रयत्न काहीठिकाणी केला. कुमठेकर रस्त्यावरील एका वस्त्रदालनाच्या बाहेर राममंदिराची छोटी प्रतिकृती उभारण्यात आली होती. त्याच्या समोरही अशा लहानमुलांना विशेष वेशभूषा करून बसवण्यात आले होते. मुलेही ही छबी एन्जॉय करत होती.
शनिवारवाडा प्रांगणात ग्रामगुढी
ढोल-ताशांचा गजर, आकर्षक रांगावली, पारंपरिक पेहरावातील नागरिकांची उपस्थिती आणि पुष्पवृष्टी करीत शनिवारवाडा प्रांगणात ग्राम गुढीची उभारणी करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी आणि रामनामाच्या गजरात संपूर्ण परिसर राममय झाला होता. श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट, बटाट्या मारुती ट्रस्ट आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने बटाट्या मारुती मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास पुणे इस्कॉनचे अनंत गोपदास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा विभाग कार्यवाह राहुल पुंडे, रोटरी क्लब पुणेचे अध्यक्ष नरेंद्र बक्षी, श्रीराम पथकाचे विलास शिगवण, महेश शेठ, राहुल बोरा, नचिकेत फडके, देवेंद्र आठवले, अश्विनी देवळणकर, बटाट्या मारुती ट्रस्टचे योगेश समेळ, संजय पांडे यावेळी उपस्थित होते.