पुणे – पुणे शहरात क्रीडासंस्कृती टिकून ठेवण्यात अनेकांचा मोलाचा वाटा आहे. समाजात सुसंवाद राखायचा असेल तर क्रीडासंस्कृती वाढली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले. पीवायसी हिंदू जिमखाना येथे स्पोर्ट्स आणि फिटनेस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना शिरोळे यांच्या हस्ते नुकतेच चॅम्पियन्स फॉर एक्सलन्स पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. शिवछत्रपती लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार विजेते, ज्येष्ठ बॉडी बिल्डर डॉ अरुण दाते, विविध क्षेत्रातील खेळाडूंसाठी मानसिक सल्लागार (मेंटल कोच) म्हणून कार्यरत असलेले स्वरूप सवनुर, क्रीडा फिजिओथेरपिस्ट डॉ. आनंद गंगवाल, भारतीय फुटबॉल टीमचे माजी व्यवस्थापक मंदार ताम्हाणे, खेळाडू आशिष कसोदेकर, सायकलिस्ट डॉ. अविनाश फडणीस, पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातू, ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले बॉक्सर आणि प्रशिक्षक मनोज पिंगळे, चॅम्पियन्स स्पोर्ट्सचे अमित मदान, आयोजक आनंद पांड्या आदी उपस्थित होते. आजही धकाधकीच्या जीवनात खेळासाठी वेळ देण्याचा प्रयत्न मी करतो असतो, क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, खेळाडू यांसोबत वेळ घालवला की एक वेगळीच उर्जा मिळते, म्हणून खेळाविषयी आपुलकी असणाऱ्यांच्या संपर्कात राहायला हवे. समाजातील एकोपा आणि सुसंवाद यामुळे टिकून राहील, असे शिरोळे म्हणाले. आज पुणे शहरात सर्वच खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेले आणि काम केलेले, खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत ही शहराची संपत्ती असल्याचे शिरोळे यांनी नमूद केले. कसोदेकर, ताम्हाणे, मदान, नातू, डॉ. गंगवाल, डॉ. फडणीस, अनुभव पिंगळे यांचे भाषण झाले. त्यांनी खेळांचे विविध पैलू सांगितले. सूत्रसंचालन चैतन्य राठी यांनी केले आणि आभार मानले.