हडपसर – आंतरराष्ट्रीय अपंग दिनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने शहरातील दिव्यांग आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांनी विविध अभ्यास स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. हडपसर मतदार संघातील महाराष्ट्र फेलोशिप ऑफ डीफ, पुणे या दिव्यांग व कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच संशोधनावर कार्य करणाऱ्या संस्थेतील विविध वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या वतीने आनंदाची सहल या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद घेत पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देत आपला सहभाग नोंदविला. संपूर्ण सहलीत चैतन्याचे उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. शारीरिकरित्या सक्षम नसतानाही आपण कोणतेही कार्य करू शकतो याचा दाखला विद्यार्थ्यांनी यावेळी दिला, शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे म्हणाले की, आपल्यातीलच घटक असलेले आपले बंधू-भगिनी दिव्यांग जरी असले तरी त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या असलेल्या गुण कौशल्यांचा उत्कृष्टरित्या वापर केला तर निश्चितच आपण या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठरणाऱ्या घटकाचा मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकासात उपयोग करू शकतो. अपंग म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या बंधू आणि भगिनींना दिव्यांग म्हणून सन्मान देत हडपसर मधील दीडशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दिव्यांग स्नेही वातावरण तयार व्हावे याकरिता ही प्रयत्न केले जाणार असल्याचे भानगिरे म्हणाले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण व पाठबळ मिळावे याकरिता विशेष निधीची ही तरतूद केली जाते.