राहू : दौंड विधानसभेच्या आधी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यामध्ये त्यांचा फायदा होऊन सरकार निवडून आले. परंतु सरकार निवडून आल्यानंतर सरकार चाळणी लावून लाडक्या बहिणी अपात्र करीत आहेत. आतापर्यंत लाखो लाडक्या बहिणी निकषांचे कारण देत अपात्र केल्या आहेत. परंतु याचीच पुनरावृत्ती अपंग, निराधार महिलांबाबतीत होत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या असलेल्या बहिणी आता कडक निकष लावून दोडक्या झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. निराधार योजनांचे अनेक महिलांना पैसे सुरू आहेत. त्यावर त्यांचा चरितार्थ चालत आहे. पीएम किसान योजनेचे पैसे मिळणाऱ्या महिलांचा देखील समावेश आहे. महिला निराधार असेल व तिला त्या योजनेचे पैसे मिळत असतील तर लाडक्या बहिणीचे तिला फक्त पाचशे रुपये दिले जातात. त्या महिलेला लाडक्या बहिणी इतकेच पैसे मिळाले पाहिजे, अशी मागणी होत आहे. एखादी निराधार महिला असेल व तिला ठराविक रक्कम सरकारकडून मिळत असेल. त्यामुळे लाडक्या बहिणीचे फक्त पाचशे रुपये मिळत असतील, ती निराधार महिला व सामान्य लाडकी बहीण या दोघींना सारखेच पैसे मिळत असतील तर मग सगळ्याच लाडक्या बहिणी निराधार समजायच्या किंवा निराधार महिला या सामान्य महिलांच्या बरोबरीत आल्या, असे समजायचे, असा प्रश्न पडला आहे. हीच पद्धत पीएम किसानचे पैसे मिळणाऱ्या महिलांबाबत आहे. ज्या महिलांना पीएम किसानचे पैसे मिळत आहे, अशा महिलांना लाडक्या बहिणींचे फक्त पाचशे रुपये येत आहेत. अर्थात पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची आहे. त्यामुळे अनेक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला नाराज दिसून येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वेगवेगळ्या योजनांचे पैसे मिळत असणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणीचे पूर्ण पैसे द्यावेत, अशी मागणी होत आहे. योजनांचा बागलबुवा अनेक योजना या केंद्र सरकारच्या आहेत. त्यांची ठराविक रक्कम ही त्या त्या योजनेमुळे त्यांच्या खात्यात जमा होत आहे. परंतु या योजना केंद्र सरकारच्या असताना त्यांचा बेस धरून राज्याच्या योजनेचे पैसे कमी करणे कितपत योग्य आहे. केंद्राचे नियम वेगळे व राज्याचे नियम वेगळे असू शकतात. त्यात आज केंद्रात व राज्यात एका विचाराचे सरकार आहे. भविष्यात सरकार बदलले तर मग या नियमांचे काय असा प्रश्न शिल्लक राहतो. विशेष योजना विशेष महिलांसाठी एखादी महिला ही निराधार असेल, समाजात ती महिला मागे पडते. त्यासाठी सरकार तिला उपजिविकेसाठी ठरवून रक्कम देते. ते तिच्या हक्काचे असतात. मग अशा महिलाना लाडक्या बहिणीचे पूर्ण पैसे दिले तर तिचा चरितार्थ चांगला चालेल, अशी प्रतिक्रिया वंचित लाभार्थ्यांपर्यंत उमटत आहे.