भुईंज : शासनाकडून लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम वेळच्यावेळी मिळत असल्याने लाडक्या बहिणी तुपाशी तर संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अपंग,विधवा यांना दिले जाणारे अनुदान गेल्या तीन महिन्यापासून रखडल्याने लाभार्थी निराधार झाले आहेत. अनुदान जमा झाले का नाही यासाठी जिल्ह्यातील निराधार लाभार्थी बँकेत जाऊन अनुदानाची चौकशी करताना दिसत आहेत. निराधार योजनेचे तीन महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत. संजय गांधी निराधार योजना, विधवा, अपंग, श्रावणबाळ योजनेचे अनुदान मागील तीन महिन्यापासून रखडले असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनुदानाची जास्त गरज निराधारांना असतानाही त्यांच्याकडे सरकार पाठ फिरवत आहे का? असा प्रश्न निराधार विचारत आहेत. अनेक लाभार्थी तर या अनुदानावरच अवलंबून आहेत. हे लाभार्थी सातत्याने बँकेत जाऊन अनुदान जमा झाले का याबद्दल चौकशी करतात व अनुदान जमा न झाल्याने आल्या पावली निराश होऊन परत घरी जातात. या लाभार्थ्यांचे अनुदान रखडल्याने लाभार्थ्यांचे खाण्याचे वांदे झाले आहेत. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, अपंग योजना, श्रावणबाळ योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना तीन महिन्यापासून अनुदान देण्यात आलेले नाही. त्यामुळे निराधार आर्थिक अडचणीत आले आहेत. यासाठी शासनाने निराधारांची अडचण लक्षात घेऊन अनुदान तात्काळ खात्यामध्ये जमा करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी शासनाकडून निराधारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्याच्या भरोवशावर न जगता योजनेचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या पैशाचा उपयोग औषधे खरेदी करण्याबरोबर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी करता येऊ शकेल. मात्र, शासनाकडून गेल्या तीन महिन्यांपासून निराधारांची अडवणूक केली जात आहे. ज्यांना आधार नाही त्या निराधारांची सरकारला काळजी आहे का ? नाही असा सवाल आथिर्क संकटात सापडलेल्या निराधारांकडून उपस्थित होत आहे.