रूपगंध: सहल फत्ते झाली

रविवार होता, शाळेला सुट्टी होती. सातवीच्या वर्गात शिकणारा राघव शाळेच्या ग्रंथालयातून आणलेलं विंदा करंदीकरांचं ‘राणीची बाग’ हे पुस्तक संध्याकाळी घरात वाचत बसला होता. तेवढ्यात तिथे त्याची धाकटी बहीण राधिका आली. ती राघवच्याच शाळेत सहावीच्या वर्गात शिकते. राघवकडे कवितेचं पुस्तक पाहून ती हरखली. तिला कविता वाचायला, लिहायला खूप आवडतात. तिने थोड्या वेळेसाठी राघवकडे पुस्तक मागितले. राघवनेही आढेवेढे न घेता तिला पुस्तक दिले. राधिकाने पुस्तकातली ‘राणीची बाग’ ही कविता नेमकी काढली आणि मोठ्याने वाचायला ती लागली.
‘स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग…’ अख्खी कविता मस्तच ठेक्यात तिने म्हटली. आई-बाबाही तिथेच बाजूला होते. ते आणि राघव कान टवकारून राधिकाचं कविता वाचन ऐकत होते. कविता संपल्यानंतर राघवने टाळ्या वाजवल्या. आई तर लगेच म्हणालीसुद्धा, ‘किती छान वाचलीस राधिका तू कविता. कानाला अतिशय गोड वाटली बघ.’
राघव बाबांना म्हणाना, ‘बाबा, काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आलं होतं, की राणीची बाग सुरू होऊन साठ वर्षांहून अधिक काळ झालाय. मुंबईतील हे एकमेव आणि भारतातील सर्वात जुने असे हे प्राणीसंग्रहालय आहे. बरोबर ना?’ बाबा म्हणाले, ‘अगदी बरोबर राघव.’ राधिका लगेच म्हणाली, ‘बाबा राणीच्या बागेबद्दल आम्हाला आणखी माहिती सांगा ना?’ बाबा म्हणाले, ‘होय सांगतो, बरं का मुलांनो, मुंबईसारख्या वातावरणात विविध प्रकारचे पशुपक्षी पहायचे असतील तर राणीची बाग हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे हत्ती, पाणघोडे, निळे बैल, बंगाल वाघ आणि बिबट्या यांसारखे पशू तर रोहीत, सारस, बगळे, करकोचे, मोर, पेंग्विन्स यांसारखे पक्षी पाहायला मिळतात.
विविध प्रकारचे जलचर आणि सरपटणारे प्राणीसुद्धा येथे आढळतात. शिवाय या बागेत तीन हजाराहून अधिक विविध प्रकारची पुरातन झाडे, औषधी वनस्पती आणि फुलांची झाडे आहेत. हे ठिकाण मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच भायखळा येथे आहे. हे ठिकाण पर्यटकांचं खास आकर्षण आहे. ही राणीची बाग 60 एकरच्या परिसरात पसरलेली आहे. 1961 मध्ये ब्रिटिश राजवटीत ‘व्हिक्टोरिया गार्डन्स’ या नावाने हे उद्यान सुरू केलं होतं. येथील डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियमध्ये मुंबईच्या अनेक पुरातत्व कलाकृती, पुतळे आणि ऐतिहासिक छायाचित्रे आहेत.’
बाबांनी सांगितलेली माहिती ऐकून राघव आणि राधिका अवाक झाले. राधिका म्हणाली, ‘बाबा आपण जाऊया का राणीची बाग पाहायला?’ बाबा म्हणाले, ‘ठीक आहे या बुधवारी मला ऑफिसला सुट्टी आहे. तुमची शाळेची परीक्षाही तोपर्यंत संपेल. बुधवारी जाऊया आपण.’ राधिका आणि राघवला बुधवार केव्हा येतो असे झाले? बुधवारच्या दिवशी सकाळी दहा वाजता सगळेच राणीची बाग पाहायला निघाले. पण तेथे गेल्यावर सार्यांचाच हिरमोड झाला. नेमकी बुधवारी राणीची बाग पाहण्यासाठी बंद होती. बाबा म्हणाले, ‘अरे माझ्या लक्षात कसे आले नाही!’
राघव, राधिका तर खूप नाराज झाले. खूप दिवसांनी बाबा त्यांना बाहेर फिरायला घेऊन आले होते. इथे तर बागेला मोठं टाळं. मुलांची नाराजी कशी दूर करावी ते आई-बाबांना कळेना. बाबांनी थोडा वेळ विचार केला आणि पटकन त्यांच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. त्यांनी एका टॅक्सीला हात केला आणि सगळ्या जणांना टॅक्सीत बसायला सांगितलं. राघव, राधिका थोडेसे नाराजीनेच टॅक्सीत बसले. आता टॅक्सी घराकडे वळणार असं त्यांना वाटलं. पण टॅक्सी भरधाव वेगाने वरळीकडे निघाली. टॅक्सीत बसून काचेतून खिडकीबाहेरचं जग पाहताना हळूहळू त्यांच्या डोळ्यांत कुतूहल जमा झाले. राधिकाने विचारले, ‘बाबा, कुठे जातोय आपण?’‘कळेलच सारे काही.’ एवढंच बाबा म्हणाले. मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
बरोबर दुपारी एक वाजता सगळेच वरळी येथील नेहरू तारांगण येथे पोहोचले. नेहरू तारांगणची वास्तुकला पाहून राघव, राधिका तर बेहद खुश झाले. सुंदर बनवलेला पांढरा घुमट आणि इमारतीची दंडगोलाकार रचना मुलांचे कुतूहल वाढवत होती. आधी सगळेजण तिथल्या जवळच्याच एका हॉटेलमध्ये जेवले. कारण बरोबर दीड वाजता मराठी भाषेतून अवकाश दर्शनाचा शो होता. दीड वाजता तिकीट काढून सगळे आत गेले. सुरुवातीला ‘विश्वाचे तारे आणि आश्चर्ये’ हा शो त्यांनी पाहिला. प्रोजेक्टर प्रतिमा प्रदर्शित करत असताना कथावाचक सौर मंडळाबद्दल, आपल्या ग्रहाच्या उत्क्रांतीबद्दल आणि आपल्या विश्वातील इतर रहस्यांबद्दल बोलत होते. मुलांना हा दृकश्राव्य कार्यक्रम खूप आवडला.
या शो नंतर राघव, राधिकाने तेथील दुर्बिणींद्वारे विशाल आकाशगंगेमध्ये डोकावून पाहिले. या ठिकाणाचे सर्वात आकर्षण म्हणजे क्यूबिकल्सच्या मदतीने मुले आपल्या सौर मंडळाच्या नऊ वेगवेगळ्या ग्रहांमध्ये आपले वजन मोजू शकले. तारांगणाच्या शेजारीच एक विज्ञान संकुल आहे. तिथे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा शो त्यांनी पाहिला. राघव, राधिकासाठी हे सगळंच अभिनव, आनंददायी आणि अचंबित करणार होतं. अवकाशाबद्दल जिज्ञासा वाढवणारं होतं. घरी परतताना राधिका म्हणालीसुद्धा, ‘आई-बाबा, तुम्ही आजचा आमचा दिवस अगदी खास केला. हो ना रे राघव?’ यावर राघवनेसुद्धा मोठा होकार भरला. आणि हसत हसतच तो म्हणाला, ‘आजची सहल फत्ते झाली.’
– एकनाथ आव्हाड





