Pune: साडेसहा हजार पोलिसांचे पालखी सोहळ्याला ‘संरक्षक कडे’

पुणे – हजारो वारकरी, दर्शनासाठी भाविकांची उसळलेली गर्दी अशा भक्तीजल्लोषात शुक्रवारी शहरात पालखी सोहळ्याचे आगमन झाले. रात्री दहाच्या सुमारास श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नाना-भवानी पेठेत मुक्कामी विसावला.
पालखी सोहळ्यातील बंदोबस्ताचे नियोजन पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त पालखी मार्गासह शहर परिसरात तैनात करण्यात आला होता. हजारो भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केलेली होती. पालखी मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर होती.
दिंडी, वारकऱ्यांना दुतर्फा झालेल्या गर्दीतून वाट करुन देण्यासाठी पोलिसांनी खास वेगळा बंदोबस्त ठेवला होता. रात्री दहाच्या सुमारास श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील निवंडुग्या विठोाबा मंदिरात दाखल झाली. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामी दाखल झाली. समाजआरती झाल्यानंतर रात्री उशीरापर्यंत दोन्ही मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती.
शहरात पालख्यांचे आगमन, मुक्काम तसेच पालखी सोहळा विसावेपर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शनिवारी (२१ जून) पालखी सोहळा शहरात मुक्कामी असणार आहे. रविवारी (२२ जून) पालखी सोहळा शहरातून मार्गस्थ होणार असून शहरात कडक बंदोबस्त आहे.





