Pune : साहेब… आता खाकीचा रंग दाखवाच!

विश्वास सुतार
पुणे – पुणे तेथे काय उणे, ही उक्ती शहराच्या सर्वगुणसंपन्न वैविध्यासाठी अभिमानाने मिरवली जात होती. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत सर्वच प्रकारच्या गुन्हेगारांनी शहरात मांडलेले बस्तान पाहता, पुणे तेथे रोज रोज गुन्हे, असे म्हणत चरफडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
पर्यटक असो, की महिला आणि व्यावसायिकांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत गुन्हेगारांचा पडलेला विळखा सोडविण्यासाठी पोलीस आयुक्त साहेब आता तरी तुमच्या खाकीचा रंग दाखवून शहराच्या छाताडावर नाचणाऱ्या गुन्हेगारांचा कायमचाच बंदोबस्त करा, अशा तीव्र प्रतिक्रिया पुणेकरांतून व्यक्त होत आहेत.
साधारणतः मार्चअखेरीस पुणे पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण घटल्याचे सांगण्यात आले. कागदावर गुन्हेगारी घटल्याचे रकानेच्या रकाने माध्यमांत छापूनही आले. मात्र, जबरी चोरी, दिवसाढवळ्या पडणारे दरोडे, बलात्कार आणि शहरासह उपनगरांत हातात कोयते घेऊन नाचणाऱ्या झुंडींमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. यातून पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला की काय, अशीही शंका व्यक्त होत आहे.
शहरातील गुंडगिरीला धाक दाखविण्यासाठी आयुक्त अमितेश कुमार यांनी टोळ्यांची आयुक्तालयासमोर परेड घेतली, सज्जड दमही भरला. गेल्या महिन्यात पुणे गुन्हे शाखेने सोलापुरात जाऊन गुंडाचा एन्काउंटरही केला. त्यामुळे पुणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आता शहराची गुन्हेगारांपासून मुक्तता होईल, या कल्पनेनेच नागरिक भारावून गेले.
परिणामी बड्या गुंडांचे बंड फार काही दिसत नसले, तरी चिल्लर गुन्हेगारांचा सुळसुळाट मात्र अजूनही संपलेला नाही. रोज कुठे ना कुठे मारामारी, कोयते नाचवत दहशत पसरविणे, धाडसी दरोड्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवून गुन्हेगारांना सोलवटण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांत अनेक गुन्ह्यांचा छडा तातडीने लावून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आल्याचे चित्र आशादायी आहे. मात्र, फक्त एकदोन जणांची काढलेली धिंड एवढेच उदाहरण न दाखवता आणखी दरारा निर्माण करण्याची आवश्यकता नागरिक बोलून दाखवत आहेत.
पोलीस दल आक्रमक झाले, तर शहरावर घोंघावणारे गुन्हेगारीचे सावट दूर होण्यास मदत होईल. अन्यथा या गुन्हेगारांचा उच्छाद पोलिसांची डोकेदुखी तर होईलच; पण सामान्य नागरिकांचे जगणे आणखी मुश्किल करून टाकेल, हे नक्की!
आणखी कठोर व्हा!
पोर्शे अपघात, बोपदेव घाट, तसेच स्वारगेट स्थानकावरील बलात्कार प्रकरण, बाणेर टेकडीवर कोरीयातील नागरिकाला लुटल्याचा प्रकारातील गुन्हेगारांचा तातडीने छडा लावण्यात पुणे पोलीस यशस्वी झाले. मात्र अशा घटनांची शृखंला थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालल्याने पोलीस प्रशासनाकडून आणखी कठोर भूमिकेची अपेक्षा आहे, तरच गुन्हेगारील पायबंद बसेल, नाही तर ये रे माझ्या मागल्या म्हणीप्रमाणे हे सत्र आवरणे अवघड होऊन जाईल.





