pune : कमाल तापमानात लक्षणीय घट

काही तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी
पुणे – शहरासह उपनगरांत पावसाने उघडीप दिली आणि उन्हाचा हलकासा चटका जाणवू लागला. परिणामी आज दिवसभर काहिसा उकाडा जाणवू लागला असून, पुढील दोन दिवस शहरातील हवामान कोरडे, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
शहरासह जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहे. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. ३४ अंशांवरील कमाल तापमान २७ अंशांपर्यंत खाली आल्याने हवेत चांगलाच गारवा वाढला होता. मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप दिली आणि सूर्यनारायणाच्या दर्शनाने पुणेकरांना दिलासा मिळाला.
गेल्या २४ तासांत कमाल तापमानात हळूहळू वाढ होत असून, मंगळवारी (दि. ४) दिवसभर आकाश निरभ्र होते. उन्हाचा हलकाचा चटका जाणवत होता. लोहगाव परिसरात सर्वाधिक ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर येथे ३०.४, चिंचवड येथे २९.९, हवेली परिसरात २९.८, पाषाण येथे २९.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण तर तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. भोर परिसरात २ मिमी पावसाची नोंद झाली, तर घाट विभागातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या.





