Pune Signboards: दिशादर्शक फलकच दिशाहीन! महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात; नेमकी काय आहे डोकेदुखी?
Pune Signboards: सामान्य जनतेसाठीचे माहिती फलक दिसेनासे, पण नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नावाचे बोर्ड मात्र चौकाचौकात अडथळारहित आणि चकाचक.

Pune Signboards – शहराबाहेरून शहरात आलेल्या तसेच शहराच्या वेगवेगळ्या भागात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जाताना वेगवेगळ्या भागांची दिशा तसेच त्या भागातील माहिती मिळावी या उद्देशाने महापालिकेकडून दरवर्षी लाखो रुपये खर्चून दिशादर्शक फलक तसेच बोर्ड लावण्यात येतात. मात्र, शहरातील अनेक फलकच दिशाहीन झाले आहेत. अनेक भागांमध्ये फलकांच्या पुढेच झाडांची वाढ झालेली आहेत.
तर काही ठिकाणी थेट वाहतुकीचे सिग्नलच या फलकांना आडवे आले आहेत. त्यामुळे या फलकांवरील माहितीच दिसत नाही. तर अनेक फलकांचा रंग तसेच अक्षरी पुसली गेल्याने अथवा ते अर्धवट तुटलेले असल्याने ते वाचताच येत नसल्याचे चित्र शहरभर आहे. शहरात महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून दिशादर्शक फलक लावले जातात. त्यावर पुढे कोणता भाग आहे.
तसेच, त्या भागातील प्रमुख ठिकाणांची माहिती असते त्यामुळे प्रवाशांना रस्ते लक्षात येऊन इच्छितस्थळी वेळेत पोहचता येते. महापालिका दरवर्षी पथ विभाग, प्रकल्प विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून असे फलक लावते. मात्र, ते एकदा लावल्यानंतर त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. त्यातच, अनेकदा हे फलक नगरसेवकांच्या वाॅर्डस्तरीय निधीतून लावण्यात आलेले असल्याने त्यावर त्यांचे नावही असते.
मात्र, सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात आदर्श आचारसंहितेत ही नावे झाकली जातात मात्र अनेकदा पूर्ण फलकच झाकला जातो. त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर असे दिशादर्शक फलक पूर्ण पूर्ववत करणे अपेक्षित असते. मात्र, अनेक ठिकाणी ते झाकलेले असल्याने नागरिकांना त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.
नावाचे फलक मात्र अडथळ्याविना
एकीकडे शहरातील दिशादर्शक फलक अडथळ्यांमुळे नागरिकांना दिसत नाही आणि त्यावरील माहिती समजणे कठीण जात असतानाच दुसरीकडे मात्र चार महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नावाचे फलक मात्र एकदम चकाचक आणि अडथळारहित आहे. उलट नगरसेवकांचे फलक चौकातून कोणत्याही दिशेने सहज दिशेने दिसतील आणि त्याच्या समोर सिग्नल, झाड अथवा इतर कोणतेही अडथळे येणार नाहीत याची खबरदारी मात्र प्रशासनाने प्रामाणिकपणे घेतली असल्याचे पाहायला मिळते.






