Pune : ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस; ढिगाऱ्याखालील जखमींची पालिका आयुक्तांनी घेतली भेट

पुणे – नांदेड सिटीलगत मुठा नदीपात्रात पालिकेच्या नदीसुधार योजनेतील ड्रेनेज लाईनच्या कामात कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे ठेकेदाराला चांगलेच भोवणार आहे. याप्रकरणी पालिकेने खुलासा मागवत ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच दुर्घटनेतील जखमींसह, मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याच्या सूचना पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनास दिल्या आहेत.
आयुक्तांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळाची पहणी केली. तसेच रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कामगारांशी चर्चा करत घटनेची माहिती घेतली. पुढील कामावेळी कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, जायकाचे प्रकल्प प्रमुख जगदिश खानोरे यावेळी उपस्थित होते.
सुरतच्या कंपनीला काम
पालिका जपानमधील जायका कंपनीच्या माध्यमातून नदीसुधार योजनेचे काम करत आहे. हे काम सुरतमधील न्वायरो कंट्रोल अँड तोशीबा वाॅटर सोल्युशन या कंपनीस दिले आहे. ही कंपनी वरील काम स्थानिक ठेकेदारांकडून करून घेत आहे. त्याच दरम्यान सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला तर तीनजण जखमी झाले.
आजच्या बैठकीत कारवाई
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी कंपनी अधिकाऱ्यांची उद्या तातडीची बैठक बोलविली आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्य़ाच्या सूचना देऊनही या नियमांचे पालन होत नसल्याचे या घटनेने समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी कंपनीवर कारवाईचा करण्याचा निर्णय बैठकीत होण्याची शक्यता आहे.





