पुणे: ‘कोव्हॅक्सीन’चा तुटवडा

पुणे –करोना प्रतिबंधक लस “कोव्हॅक्सीन’चा तुटवडा निर्माण झाला असून महापालिकेकडे शुक्रवारपुरताच साठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेने केंद्र संख्या कमी केली असून, केवळ 40 केंद्रांवरच कोव्हॅक्सीनचे लसीकरण ठेवण्यात आले आहे.
15 ते 18 या कुमारवयीन वयोगटासाठी लसीकरण तीन जानेवारीपासून सुरू केले आहे. याशिवाय 10 जानेवारीपासून फ्रंटलाइन, हेल्थकेअर आणि 60 वर्षे आणि त्यापुढील वयोगटाच्या नागरिकांसाठी “बुस्टर’ डोस सुरू करण्यात आले आहेत. महापालिकेने सुमारे 179 केंद्रांवर याचे लसीकरण सुरू केले होते. मात्र, आता डोस उपलब्ध नसल्याने केंद्र कमी करण्यात आले आहेत.
याशिवाय 18 वर्षे वयापुढील नागरिकांसाठीचे पहिला आणि दुसरा डोस सुरू आहेच. त्यामुळे लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे तर लसीचा पुरवठा कमी होत आहे.
कोविशील्ड लसीचे डोस पुरेसे आहेत. परंतु, कोव्हॅक्सीनचे डोस मात्र कमी आहेत. सध्या, साडेपाच हजार डोसच शिल्लक असून शुक्रवारी राज्याकडून लस उपलब्ध न झाल्यास “कोव्हॅक्सीन’चे केंद्र बंद ठेवावे लागण्याची शक्यता आहे.
“कोव्हॅक्सीन’चे डोस शुक्रवारी मिळतील, असे पुणे विभागाने सांगितले आहे. ते मिळाले तर शनिवारचे नियोजन करता येईल. अन्यथा केंद्र बंद ठेवावे लागणार आहेत.
– डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण विभागप्रमुख





