Pune: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी केली बोपदेव घाट प्रकरणातील घटनास्थळाची पाहणी

पुणे – कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोपेदेव घाट परिसरात पाच दिवसांपूर्वी 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या घटनास्थळाची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली.
पाच दिवस उलटूनही अद्याप आरोपीपर्यंत पोलिसांना का पोहोचता आले नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तपासात काय अडचणी येतात याबाबत देखील पवारांनी बड्या अधिकाऱ्यांना विचारलं. त्याचबरोबर या प्रकरणातील माहिती जाणून घेतली. पुण्यात महिला, मुली सुरक्षित आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, चौकीत पोलिस नाहीत हा प्रॉब्लेम मला शहरात अनेक ठिकाणी दिसून येतो. वर्दीची भीती नसल्याने गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांना लिंक लागत नाही त्यामुळे आरोपी सापडत नाहीत. इथं जाता येता कुठलाच कॅमेरा नाही, चौकी आग्रहाने मागितली होता, ब्लॅक स्पॉट आहे, टेक्निकल लोक कमी आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या दिवसापासून ही घटना बोपदेव घाटात घडली, त्या दिवसापासून रोज मी एसपी आणि सीपी दोघांशी बोलत आहे. पोलिस आयुक्तांचाही यात थोडा भाग येतो. पाच दिवस झाले आरोपी सापडत नाहीत ही गंभीर आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. रात्री अपरात्री तिकडून अनेकजण जात असतात, दोघे बसले होते, त्यावेळी त्या तरूणीसोबत सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला ही दुर्दैवी घटना आहे, असंही सुळे यावेळी म्हणाल्या.





