Pune : शनिवारवाडा, पर्वतीवर वारकऱ्यांचा मेळा

पुणे – पुण्यातील ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन स्थळांना वारकऱ्यांनी भेट देत आपल्या वारीचा अनुभव अधिक समृद्ध केला. शनिवारी सकाळपासूनच वारकऱ्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, दत्त मंदीर, मंडई परिसरात दर्शनासाठी गर्दी केली होती, गणेशोत्सवासारखे वातावरण निर्माण झाले होते. अनेक वारकऱ्यांनी शनिवारवाड्याला भेट दिली.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत प्रवेश असल्याने अनेक वारकऱ्यांनी वाड्याचा इतिहास जाणून घेतला. शनिवारवाड्या सोबतच पर्वती टेकडीवर मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. पर्वतीवर असलेल्या विविध मंदिरांचे दर्शन, पेशवेकालीन संग्रहालय आणि बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्यांबरोबर छायाचित्रे काढण्याचा आनंद वारकऱ्यांनी लुटला.
या सोबतच कात्रज प्राणी संग्रहालय, आगाखान पॅलेस, जंगली महाराज मंदीर, पाताळेश्वर लेणी परिसरातही वारकऱ्यांनी पर्यटनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. दुपारी वारकरी सारसबागेत विश्रांती घेताना दिसले. मात्र, दुपारी बाग बंद असल्याने काही वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
रेनकोट, पिशव्या, चपला खरेदी
रेनकोट, छत्री, चपला, पिशव्या, कपडे, टाळ, मोबाइल चार्जरसह दररोजच्या प्रवासातील आवश्यक असलेले साहित्य वाकऱ्यांनी खरेदी केले. या साहित्य खरेदीसाठीही बाजारपेठेत वारकऱ्यांची लगबग दिसून आली. अनेकांनी पुण्याच्या आसपास असलेल्या गावांमधील नातेवाईकांच्या भेटीला प्राधान्य देत पीएमपीने प्रवासही केल्याचे दिसून आले. खडकवासला धरणाच्या परिसरातही काहींनी पर्यटन केले.
वारकऱ्यांना असे भावले पुणे..
पुण्यात सर्वात भारी वातावरण मला इथं वाटलं. शहराच्या मध्यभागी असं ठिकाण असेल असं वाटलं नव्हतं. मी सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेतलं आणि संग्राहालयालाही भेट दिली. – विश्वास टिप्टे, वारकरी, बीड
मी शहरात फिरत फिरत नाना पेठ, सदाशिव पेठ, दगडूशेठ मंदिर, शनिवारवाडा पाहून सारसबागेत आलो. याआधी इतकं फिरायला जमलं नव्हतं. – दादासाहेब शिंदे, वारकरी, बीड
मला या वाड्याबद्दल फार माहिती नव्हती. आतल्या माहिती फलकांमुळे जाणून घेता आलं. अवशेष पाहून समाधान मिळालं. – धनंजय निंबाळकर, वारकरी, बारामती.





