पुणे – कामाच्या कारणावरून टोमणे मारल्याच्या रागातून सेंट्रिंग मिस्त्रीचा खून करणार्याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने निकालात नमूद केले. राकेश अविनाश गायकवाड (वय 23, रा. अत्रेवाडा जेजुरी. मूळ रा. अहिल्यानगर) याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, अविनाश रंभाजी महांकाळे (रा. बेलापूर, जि. अहिल्यानगर) असे मृताचे नाव आहे. दि. 14 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री ही घटना घडली. राकेश हे सहकार्यांसोबत जेवण करत होते. त्यावेळी ‘राकेशला काम येत नाही. तो नुसताच बढाया मारतो’ असे अविनाश म्हणत होता. या दरम्यान राकेश तेथे आला आणि त्याने अविनाशकडे विचारणा केली. त्यानंतर दोघे एकमेकांना शिविगाळ करत मारहाण करू लागले. राकेशने अविनाशच्या गळ्याजवळ चाकू नेल्याने त्यांना थोडे खरचटले. सहकार्यांनी भांडणे सोडवून राकेशला खोलीबाहेर आणत चाकू फेकून दिला. त्यानंतर, मध्यस्ती केल्यास मारण्याची धमकी राकेश याने अन्य सहकार्यांना दिल्याने ही बाब साइटवरील सेल्स इन्चार्ज यांना सांगण्यासाठी सहकारी निघून गेले. ते परत आल्यानंतर राकेश तेथून पळून गेला. सहाकऱ्यांनी खोलीत पाहिले असता अविनाश हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या प्रकरणात सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादीच्या साक्षीसह वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. तपासी अंमलदार म्हणून अण्णासाहेब जाधव व आर. व्ही. माळेगावे यांनी काम पाहिले.