पुणे: दुय्यम निबंधक कार्यालयाचा पदभार शुक्रवारी महिलांच्या हाती

पुणे – जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या 27 दुय्यम निबंधक कार्यालयांचा कारभार शुक्रवारी (दि.७) महिलांच्या हाती असणार आहे. तसेच सह जिल्हा निबंधक पदाचा पदभारही महिला अधिकारी यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे शुक्रवारी शहरातील नोंदणी व मुद्रांक विभागाचा कारभार महिलाच पाहणार आहे.
शनिवारी (दि.8 ) रोजी जागतिक महिला दिन आहे. मात्र या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने हा उपक्रम शुक्रवारी (दि.7) साजरा करण्यात येणार आहे. सह जिल्हा निबंधक तसेच दुय्यम निबंधक हवेली क्रमांक १ ते २७ या कार्यालयांचा तसेच विवाह नोंदणी अधिकारी पुणे जिल्हा या कार्यालयाचा कार्यभार शुक्रवारी (दि.७) सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे सोपविला जाणार आहे.
सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर या पदाचा कार्यभार संगिता जाधव पठारे यांच्याकडे तर सह जिल्हा निबंधक वर्ग-२ या पदाचा पदभार राजश्री खटके यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यालयाच्या अधिनस्त सहदुय्यम निबंधक हवेली क्र. १ ते २७या कार्यालयांतील वर्ग २ पदाचा कार्यभार महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेशही नोंदणी विभागाकडून काढण्यात आले आहेत.
याविषयी माहिती देताना सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी सांगितले की, 27 पैकी सात महिला प्रथमच दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
“सह जिल्हा निबंधक पुणे कार्यालयाने महिलांच्या सन्मानार्थ शुक्रवारी दुय्यम निबंधक पदाचा पदभार महिला अधिकार्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.” रविंद बिनवडे, नोंदणी महानिरिक्षक
“दुय्यम निबंधक कार्यालयाची जबाबदारी महिला अधिकारी यांच्याकडे सोपविण्याचा उपक्रम सह जिल्हा निबंधक पुणे कार्यालयाने घेतला आहे. या उपक्रमाचे मनापासून कौतुक आणि त्यासाठी शुभेच्छा.” – नयना गुंडे, आयुक्त महिला व बालविकास विभाग
“दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये काम करणे आज तुलनेने आव्हानात्मक झाले आहे. हे आव्हानात्मक काम महिला अधिकारी सक्षमरित्या पूर्ण करू शकतात हे सप्रमाण सिद्ध करण्याच्या दृष्टीने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.” – संतोष हिंगाणे, मुद्रांक जिल्हाधिकारी





