पुणे : ‘सायन्स पार्क’ विस्तारणार

पुणे – किशोरवयीन मुलामुलींना विज्ञानाची गोडी लागावी व कुतूहल निर्माण व्हावे, या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 2014 मध्ये “सायन्स पार्क’ सुरू केले होते. आता या प्रकल्पाचा विस्तार होणार आहे. या पार्कच्या नव्या इमारतीचे उद्घाटन 28 फेब्रुवारीला सकाळी
10 वाजता होणार आहे.
या विषयांची मिळते माहिती
जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आदी विषयांत तयार करण्यात आलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती येथे विद्यार्थ्यांना मिळते. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील माहिती देण्याबरोबरच विद्यापीठ परिसरात असणाऱ्या अनेक पर्यावरणविषयक घटकांची सफरही घडविण्यात येते. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी सायन्स पार्कला भेट दिली आहे.
यांची प्रमुख उपस्थिती
भारत फोर्ज कंपनीचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन होईल. यावेळी परसीस्टंट सिस्टीम कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे, प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आणि सायन्स पार्कचे समन्वयक डॉ. दिलीप कान्हेरे आदी उपस्थित राहणार आहेत.
“सायन्स पार्क’ नव्या इमारतीत काय असेल?
सूक्ष्मजीव आणि रसायनशास्त्र प्रयोगकक्षाबरोबरच चार स्वतंत्र प्रयोगकक्ष उपलब्ध
विज्ञान विषयक माहितीपट दाखविण्यासाठी प्रक्षेपण कक्ष असेल.
अवकाश निरीक्षणासाठी दोन मोठ्या दुर्बिणीही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.





