पुणे : सायन्स कॉंग्रेसचे पुण्यातील अधिवेशन यंदाही रद्द

पुणे – करोनामुळे येथे होणारे भारतीय सायन्स कॉंग्रेसचे 108वे अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. 100 वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास असणाऱ्या सायन्स कॉंग्रेसच्या इतिहासात प्रथमच सलग दोन वर्षे हे अधिवेशन झालेले नाही.
सिम्बॉयोसिस इन्स्टिट्यूटच्या वतीने पुण्यात गेल्या वर्षी तीन ते सात जानेवारी 2021 दरम्यान हे अधिवेशन भरवण्यात येणार होते. मात्र, त्याच काळात करोनाची साथ वेगाने पसरल्याने हे अधिवेशन पुढे ढकलले. त्यानंतर तेथेच हे अधिवेशन वर्षभरानंतर म्हणजे जानेवारी 2022 मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले.
महिला सक्षमीकरणातून शाश्वत विकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञान ही संकल्पना घेऊन होणाऱ्या या कॉंग्रेसमध्ये देश-विदेशातील नामवंत संशोधक आणि विद्यार्थ्यांसह 15 ते 20 हजार जण सहभागी होतील, अशी अपेक्षा होती.
2022 मध्ये सायन्स कॉंग्रेसचे अधिवेशन होणार नाही. आपण आता 2023 मध्ये होणाऱ्या अधिवेशनात भेटू. हे अधिवेशन रद्द करण्याचे मुख्य कारण म्हणजे नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी करोनामुळे भारतात येण्यास दिलेला नकार हे आहे, असे 108 व्या नॅशनल सायन्स कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी गुरुवारी सांगितले.
भारतीय सायन्स कॉंग्रेसचे अधिवेशन भरवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या संस्थांकडून नव्याने अर्ज मागवण्यात येत आहेत आणि जर सिम्बायोसिसला त्याच्या आयोजनात स्वारस्य असेल तर ते पुन्हा अर्ज करू शकतात. सायन्स कॉंग्रेसची पुनरावलोकन समितीने सिम्बॉयोसिसने पुन्हा अर्ज करावा असे सुचवले आहे. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय कार्यकारी समिती घेणार असल्याने पुण्यात हे अधिवेशन होणार की नाही याची कल्पना मला नाही, अशी पुस्ती सक्सेना यांनी जोडली.
याचाच अर्थ सुमारे 20 वर्षांनंतर सायन्स कॉंग्रेसचे अधिवेशन भरवण्याची पुण्याला मिळालेली संधी आता अधांतरी झाली आहे. कारण 2023 मध्ये होणाऱ्या अधिवेशनासाठी चार ते पाच राष्ट्रीय विद्यापीठांनी अर्ज करण्याची तयारी सुरू केली आहे.
सिम्बॉयोसिसच्या संयोजकांनी कळवले आहे की, त्यांनी 22 समित्या तयार केल्या आहेत. नोबेल विजेते आणि नामवंत शास्त्रज्ञांशी संपर्क, वेळापत्रक बनवले आहे. सर्व आवश्यक त्या गोष्टींची तरतूद केली आहे.
गोव्यात मात्र भरतोय विज्ञान उत्सव
दखल घेण्याजोगी बाब म्हणजे गोव्यामध्ये सातव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान उत्सवाचे आयोजन 10 ते 13 डिसेंबर 2021 या काळात केले जात आहे. या उत्सवाचे आयोजन विज्ञान भारती, विज्ञान तंत्रज्ञान विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, भारतीय वैद्यक संशोधन परिषद आणि
नॅशनल सायन्स कॉंग्रेसने 2022 या वर्षात सिंम्बायोसिसमध्ये होणारे सायन्स कॉंग्रेसचे अधिवेशन अनधिकृतरित्या रद्द झाल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत अद्याप लेखी पत्र आलेले नाही. मात्र यजमान म्हणून यंदाच्या वर्षीची अधिवेशनाची सर्व व्यवस्था यापूर्वीच केली आहे. अगदी आजही सायन्स कॉंग्रेसचे अधिवेशन भरवायचे म्हटल्यास त्याला आमची तयारी आहे. पुण्यातील सायन्स कॉंग्रेसच्या अधिवेशनाच्या आयोजनास आम्ही उत्सुक आहोत.
– डॉ. राजीव येरवडेकर, 108 व्या सायन्स कॉंग्रेसचे संयोजक सचिव





