पुणे : आजपासून शाळा सुरू

पुणे – करोनाच्या प्रादुभावामुळे पुण्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता, करोनाचा प्रादुर्भावाचा आढावा घेण्यात आला असून इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा मंगळवार (दि.1) पासून सुरू करण्याचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव कधी वाढतो आहे तर कधी कमी होताना दिसतो आहे. यामुळे शाळा कधी चालू तर कधी बंद ठेवाव्या लागत आहेत.
शाळा सुरू करण्याची मागणी विविध संघटनांकडून सतत करण्यात येत होती. त्याची दखल घेत राज्य शासनाने करोनाची स्थानिक परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित शनिवारी अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली.
या बैठकीत करोनाच्या संकटांचा सवीस्तर आढावा घेण्यात आला व शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे महापालिकचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी शाळांबाबत तात्काळ आदेशही जारी केले आहेत.
पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळा अर्ध सत्रात सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. नववी ते बारावीचे नियमित वर्ग सुरू होणार आहे. शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याबाबतच्या सूचनाही जारी केलेल्या आहेत. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी करोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले नसल्यास संबंधितांचे आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून त्याचे प्रमाणपत्र शाळेत दाखल करावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
शाळांनी विद्यार्थी, पालकांच्या ऑनलाइन बैठकांचे सत्र राबविले असून त्यांना शाळा सुरू करण्याबाबत आवश्यक त्या सूचनाही दिलेल्या आहेत. याबाबत विद्यार्थी, पालकांना एसएमएस, ई-मेल पाठविण्यात आले आहेत. काही शाळांच्या ऑनलाइन परीक्षा सुरू असून त्यांच्या परीक्षा त्यास पध्दतीने सुरु ठेवाव्या लागणार आहेत.





