Pune: शालेय शिक्षणमंत्र्यांसह बडे अधिकारी जर्मनीच्या दौऱ्यावर

पुणे – शालेय शिक्षणमंत्री व अन्य सहा बडे अधिकारी सहा दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. महाराष्ट्र शासन व जर्मनीमधील बाडेन वुटेनबर्ग या राज्यामधील सामंजस्य कराराच्या अनुषंगाने कृतीदलाची बैठक व विविध आंतरराष्ट्रीय संस्थांना भेटीसाठी हा दौरा आहे. राज्यामधील कुशल मनुष्यबळाला युरोपियन देशांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने हा दौरा काढण्यात आलेला आहे.
युरोपियन युनियन मधील विविध देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. महाराष्ट्रात औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येते. शालेय शिक्षण विभागामार्फत इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना कौशल्यविषयक विषय शिकवण्यात येत आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. मात्र पुरेशा प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध नाहीत.
या कुशल मनुष्यबळास युरोपियन युनियन देशांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होवू शकते. यासाठी या विद्यार्थ्यांना काही प्रगत कौशल्य, जर्मन भाषा, परदेशात पाळावयाचा शिष्टाचार आदीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी जर्मन राष्ट्रातील बाडेन वुटेन बर्ग या राज्यासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने कृतीदलाची बैठक १२ जून रोजी स्टुटगार्ड जर्मनी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या दौऱ्यात विविध कंपन्या, हॉस्पीटल, शाळा आणि विविध आस्थापनांना भेट देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. या दौ-यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये पाठविल्यानंतर तेथे व्हिसा, राहण्याच्या तसेच इतर काय अडचणी येतील याबाबतही चर्चा होणार आहे. सामंजस्य करारामुळे आणि दौ-यामुळे आपल्या राज्यामधील कुशल मनुष्यबळात युरोपियन देशांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
१० ते १५ जून या कालावधीच्या दौ-यामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव इड्जेस कुंदन, उपसचिव तुषार महाजन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, शालेय शिक्षण मंत्र्यांचे खाजगी सचिव मंगेश शिंदे आदींचा समावेश आहे.
दौऱ्यासाठी स्टार्स प्रकल्पातून खर्च
जर्मनी दौ-याचा संपूर्ण खर्च शालेय शिक्षण विभागांतर्गतच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदे मार्फत स्टार्स प्रकल्पांतर्गतच्या तरतूदीतून करण्यात येणार आहे. दौ-याचा संपूर्ण कालावधी प्रवासाच्या कालावधीसह कर्तव्य कालावधी म्हणून समजण्यात येणार आहे. विदेश दौरा पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विदेश दौ-यासंबंधीचा विस्तृत अहवाल प्रशासकीय विभागास तसेच सामान्य प्रशासन विभागास सादर करावा लागणार आहे. विदेश दौऱ्यात प्राप्त केलेल्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग अन्य अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी करावा लागणार आहे.





