पुणे – सावित्रीबाई फुले आणि पुणे विद्यापीठाच्या आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा मु. सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर बारामती येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सौरव शिंगाडे या विद्यार्थ्याने ८७ किलो वजन गटांत ग्रीको रोमन प्रकारामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके यांच्या हस्ते सौरव शिंगाडे याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. पैलवान सौरव शिंगाडे याची चंदीगड युनिव्हर्सिटी, चंदिगड येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघामध्ये निवड झाली आहे. या खेळाडूस वस्ताद सोपान शिंगाडे व डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. रुपेश थोपटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.