Pune : नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान – माजी नगरसेवक अनिल टिंगरे

विश्रांतवाडी – प्रभागातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देणार, असा निवडणूक प्रचारादरम्यान शब्द दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेत शाळेची इमारत उभारली. या इमारतीत शाळा सुरू करण्याबाबत आवश्यक मान्यता मिळविण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून प्रयत्न केले. यातूनच शाळा सुरू करण्यात यश आले, दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान वाटत आहे, असे मत माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्र. १ मधील मुंजाबावस्ती येथे बांधलेल्या बीजीटी ई-लर्निंग या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा शुभारंभ आज (दि.२३) पार पडला. माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे यांच्या विकास निधीतून या शाळेचे काम पूर्ण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेविका ऐश्वर्या आशुतोष जाधव, बाबुराव टिंगरे, जयेश शेंडकर, विनायक तुम्मा, आशादेवी धुमाळ, अनिता वाघमारे, कपिल राऊत, मुख्याध्यापिका ज्योती दोरगे, अतुल टिंगरे, पूजा धनंजय जाधव, ज्योती सावर्डेकर, विठ्ठल कोथरे, संदीप दांगट, शैलेश रणनवरे, सुभाष पाटील, प्रकाश सुतार, जितेंद्र जगताप, चंद्रकांत जंजिरे, जितेंद्र कराळेकर, चारूदत्त पाटील, कैलास गोसावी, गोपाळ पाटील, स्वप्नील भोसले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर सरोदे तर धनंजय जाधव यांनी आभार मानले.
‘पुणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु झालेल्या या शाळेत छोटा गट, पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू झाले असून ही शाळा संपूर्ण इंग्रजी माध्यमाची असणार आहे. पालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण, गणवेश, वह्या-पुस्तके आदि सर्व सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेत.’ – शुंभागी चव्हाण, उपप्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग
‘पालिकेच्या माध्यमातून सुरु केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा मुंजाबावस्तीमधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना विशेष लाभ होणार आहे. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.’ – ज्योती सावर्डेकर, सामाजिक कार्यकर्त्या





