Pune Satara Highway : मुख्यमंत्र्यांच्या एका दौऱ्याची कमाल; ३ वर्षांपासून रखडलेले रस्ते एका रात्रीत ‘चकाचक’
Pune Satara Highway : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रांजे दौऱ्यापूर्वी पुणे-सातारा महामार्गावरील सेवा रस्त्यांचे काम युद्धपातळीवर पूर्ण; प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर नागरिकांचा संताप.

Pune Satara Highway – पुणे-सातारा महामार्गावरील सेवा रस्त्यांची दुरवस्था अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. खड्डे, धूळ आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हेच रस्ते अवघ्या एका रात्रीत दुरुस्त करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजे (ता. भोर) येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार असल्याचे निश्चित होताच, संबंधित विभागाने तातडीने कामाला सुरुवात केली. वर्षानुवर्षे रखडलेले सेवा रस्त्यांचे काम अचानक वेगाने पूर्ण करण्यात आले. खड्डे बुजवणे, डांबरीकरण आणि साफसफाई अशी सर्व कामे युद्धपातळीवर पार पडली.
दरम्यान, याच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि प्रवासी गेल्या ३ ते ४ वर्षांपासून पाठपुरावा करत होते. अनेक वेळा निवेदने देण्यात आली, आंदोलनेही करण्यात आली; मात्र, प्रत्येक वेळी निधीअभावी आणि तांत्रिक कारणे पुढे करून काम पुढे ढकलले जात होते. रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली होती की, पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीमुळे प्रवास करणे कठीण झाले होते.
अपघातांचाही धोका वाढला होता. तरीही प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता, अशी नागरिकांची तक्रार आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा याच मार्गाने जाणार असल्याचे समजताच, प्रशासनाची झोप उडाली आणि संबंधित यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. त्यामुळे “नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष, पण अतिविशेष दौऱ्यासाठी तत्परता” असा आरोप आता होत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, सोशल मीडियावरही उपरोधिक प्रतिक्रिया उमटत आहेत. “मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक महिन्यातून या मार्गावरून जावे, म्हणजे रस्ते कायम चांगले राहतील,” अशी मिश्किल टिप्पणी काहींनी केली. या संपूर्ण घटनेमुळे प्रशासनाचे दुटप्पी धोरण पुन्हा एकदा समोर आले. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून केवळ वरिष्ठांच्या भेटीपुरतेच काम करणारी यंत्रणा कितपत जबाबदार आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.





