पुणे : ससूनला औंध रुग्णालयाचा आधार

पुणे – विविध मागण्यांसाठी आयुर्वेद महाविद्यालये आणि वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्न रुग्णालयांतील परिचारिका विविध मागण्यांसाठी परिचारिका शनिवारपासून बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने पत्र देऊन ससून रुग्णालयासाठी औंध सिव्हिल रुग्णालयातून परिचारिका आणि विद्यार्थी डॉक्टरांना पाचारण केले आहे. दरम्यान, परिचारिका नसल्याने रुग्णांचे हाल होत असून, अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर ढकलण्यात आल्या आहेत.
परिचारिका संवर्गातील सर्व स्तरातील 100 टक्के पदोन्नती, पदनिर्मिती आणि पदभरती बाह्यस्रोताद्वारे न करता कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी. यांसह विविध मागण्यांसाठी राज्यातील शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांनी 26 आणि 27 मे रोजी संप पुकारला होता. तसेच मागण्या मान्य न झाल्यास 28 मे पासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्या बेमुदत संपावर गेल्या आहेत. ससून शासकीय रुग्णालयातील जवळपास 800 परिचारिका यात सहभागी आहेत.
रुग्णालयात सध्या एकूण परिचारिकांपैकी 60 टक्के परिचारिका संपावर असून, उरलेल्या 40 टक्के सेवेत आहेत. तर, तातडीच्या शस्त्रक्रिया सध्या करण्यात येत आहेत. मात्र, नियोजित शस्त्रक्रिया परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर करण्यात येतील अशी माहिती, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी दिली. एकूण परिचारिकांपैकी 90 टक्के परिचारिका या संपावर गेल्या असल्याचा दावा “महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटने’ने केला आहे.
औंध हॉस्पिटलमधून 19 परिचारिका रविवारपासून ससून रुग्णालयात रुजू झाल्या आहेत. तसेच रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी निवासी डॉक्टर, नर्सिंग विद्यार्थी, उपलब्ध परिचारिका, अध्यापक, इतर डॉक्टर यांना अतिरिक्त कामाचे तास लावण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णसेवा बाधित झालेली नाही.
– डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय





