पुणे – ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. असीम सरोदे यांना बार काऊन्सिल ऑफ इंडियाने दिलासा दिला आहे. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाने दिलेल्या सनद रद्दच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर मी पुन्हा येतोय अशा शब्दांत पोस्ट शेअर करीत अॅड. सरोदे यांनी बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे आभार मानले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभेचे सभापती यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तवांवरून बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी अॅड. सरोदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत तीन महिन्यांसाठी सनद रद्द करण्याचा आदेश दिला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पक्ष आणि चिन्हाच्या खटल्याच्या सुनावणीपूर्वी अचानक सरोदे यांची सनद रद्द केल्यानंतर अनेकांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त करीत, हा निर्णय राजकीय दबावातून घेतल्याची शंका व्यक्त केली होती. या पाश्वभूमीवर त्यांनी अपिल केले होते. त्यावर निर्णय घेताना हे प्रकरण खरोखरच वकिली व्यवसायाच्या गैरवर्तणुकीचं आहे का? याबाबत सखोल चौकशी करूनच सनद रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, असे बार कौन्सिल इंडियाने म्हटले आहे. स्थगितीचा निर्णयाने सत्य प्रस्थापित झाले आहे. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाने दिलेला निर्णय प्रथमदर्शनी योग्य नसल्याचे बार काऊन्सिल ऑफ इंडियाने आदेशात म्हटले आहे. मी उद्याच उच्च न्यायालयात एका प्रकरणात स्वतः हजर राहून युक्तिवाद करणार आहे. – अॅड. असीम सरोदे (ज्येष्ठ विधीज्ञ)