Pune : सणस मैदान अखेर खुले; ट्रॅक वापरासाठी महापालिका करणार नियमावली

पुणे – आठ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या सणस मैदानावरील ऍथलेटिक्स सिंथेटिक ट्रॅकचा वापर वादग्रस्त ठरल्यानंतर अखेर मैदान पुन्हा खेळाडूंना खुले करण्यात आले आहे. ट्रॅक खराब झाल्याने मैदान काही काळासाठी बंद ठेवले होते. दुरुस्तीसाठी १० लाख रुपये खर्च करून हे काम पूर्ण केल्यानंतर आता महापालिकेने ट्रॅक वापराबाबत नियमावली तयार करण्याचे ठरवले आहे.
या नियमावलीमध्ये प्रशिक्षकांची पात्रता, खेळाडूंना ओळखपत्र (पास) देणे, ट्रॅकच्या वापराचे वेळापत्रक यांचा समावेश असणार आहे. ट्रॅक वापरासाठी १० वर्षांखालील मुलांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिरवळीवर सरावास परवानगी नाकारली असून, मैदानाच्या देखभालीसाठी आठवड्यातून एक दिवस ट्रॅक बंद ठेवण्यात येणार आहे.
गॅलरी, स्वच्छतागृह, चेंजिंग रूमची स्वच्छता, धूर फवारणी आणि उपकरणे बसविणे यावर भर दिला जाणार आहे. मैदानावर दोन अधिकाऱ्यांसह कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांनी दिली.





