Pune: लोहगावात पालिकेच्या अर्जाची ‘झेरॉक्स’ दुकानात विक्री

पुणे – महापालिकेच्या वार्षिक करपात्र रकमेत चाळीस टक्के सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्याकरिता नागरिकांना पी.टी.-३ या अर्जासह संबंधीत कागदपत्रे जोडून द्यावी लागतात. परंतु, नगररोड क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत लोहगाव येथे सहाय्यक आयुक्त कार्यालयात सदर अर्जाच मागणी केली असता झेरॉक्स दुकानातून घ्या, असे सांगितले जात आहे. पालिकेत मोफत उपलब्ध असलेल्या अशा अर्जाची विक्री दहा रूपयांना होत असल्याने नागरिकांना नाहक भुर्दंड बसत आहे.
लोहगावातील निवासी मिळकतीत राहणारे नागरिक महपालिकेच्या वार्षिक करपात्र रकमेत चाळीस टक्के सवलतीसाठी येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयात अर्ज भरण्यासाठी जात आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता नागरिकांना पी.टी.-३ अर्ज भरुन त्यासोबत कागदपत्रे जोडून द्यावी लागतात. या अर्जाचा नमुना पालिकेच्या कार्यालयात उपलब्ध नसून खासगी झेरॉक्स दुकानातून घ्यावा लागत आहे.
यासाठी झेरॉक्स दुकानदार दहा रूपये घेतो. दहा रूपये का घेता, असे विचारले असता याबाबत विचारल्यास, अधिकाऱ्यांना विचारा, असे उलट उत्तर दिले जाते. पालिकेचे छापील अर्ज पालिकेने सशुल्क किंवा निशुल्क द्यावेत, परंतु, पी.टी.-३ अर्ज खासगी दुकानदाराला वितरीत करण्याचे आणि अवाजवी पैसे गोळा करण्याचे अधिकार पालिकेने कशासाठी दिले आहेत ? असा प्रश्न लोहगावातील नागरीक करीत आहेत.
“पी.टी.-३ अर्ज खासगी झेरॉक्स दुकानातून घ्यावा लागत असल्याबाबतच्या प्रकाराविषयी कोणत्याही माहिती नाही, असा काही प्रकार होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना योग्य त्या सूचना तातडीने केल्या जातील.” – सोमनाथ बनकर, सहाय्यक आयुक्त, नगररोड क्षेत्रिय कार्यालय.





