Pune : साबुदाणा, भगर, शेंगदाणा झाला स्वस्त; आषाढीच्या पार्श्वभूमीवर मागणीत वाढ

पुणे – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात साबुदाणा, भगर व शेंगदाण्याला मागणी वाढली आहे. यंदा उत्पादन चांगले असल्याने राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात माल बाजारात दाखल होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने गतवर्षीच्या तुलनेत दरात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे.
देशात तामिळनाडू येथील सेलम या एकमेव जिल्ह्यात साबुदाणाचे उत्पादन घेतले जाते. तेथून येथे आवक होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्रातून साबुदाण्याची मागणी वाढेल, अशी शक्यतेने दररोज १०० ते १२५ टन साबुदाणाची आवक होत आहे. ही आवक नेहमीच्या तुलनेत जास्त आहे.
मार्केट यार्डात नाशिक जिल्ह्यातून भगरची दररोज ५० टनांची आवक होत आहे. यंदा मागणीच्या तुलनेत उत्पादन जास्त असल्याने सर्व जिनसांच्या दरात गतवर्षीपेक्षा पाच ते दहा टक्क्यांनी घट झाल्याची माहिती मार्केट यार्डातील साबुदाणा-भगरीचे व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशातून शेंगदाणा बाजारात
शेंगदाण्याला मध्यम स्वरुपाची मागणी असून, बाजारात दररोज १०० टन माल दाखल होत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथून आवक होत आहे. स्पॅनिशच्या चांगल्या मालाला घाऊक बाजरात किलोला ११५ ते ११७ रुपये, घुंगरूला ९५ ते १०३ रुपये, शेंगदाणा १ नंबरला १०० ते १०२ रुपये, २ नंबरला ९७ ते १०० रुपये आणि ३ नंबरला ९२ ते ९५ रुपये भाव मिळत आहे.
घाऊक बाजारातील किलोचे भाव
साबुदाणा १…………….५० ते ५४
साबुदाणा २…………….४७ ते ५२
साबुदाणा 3…………….४३ ते ५०
भगर……………………१०० ते ११०
‘आषाढी एकादशीसाठी दरवर्षी मार्केट यार्डात साबुदाणा, भगर, शेंगदाण्याला मोठी मागणी असते. मात्र, यंदा नेहमीच्या तुलनेत उत्पादन जास्त आहे. त्यामुळे भावात घसरण झाली आहे.’ – आशिष दुगड, साबुदाणा-भगरचे व्यापारी, मार्केट यार्ड





