Pune Gramin : घोडनदीला महापूर, शेतीसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान
आंबेगाव तालुक्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत (Pune Gramin) झाले असून डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे घोडनदीला महापूर आला आहे.

Pune Gramin : आंबेगाव तालुक्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत (Pune Gramin) झाले असून डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे घोडनदीला महापूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठावरील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून शेतीपिके, सिंचन व्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पूराच्या पाण्याने अनेक गावांतील दशक्रिया घाट, स्मशानभूमी, मंदिरे, बैलगाडा घाट तसेच पाणीपुरवठा योजना पाण्याखाली गेल्या. घोडनदीवरील अनेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवरील लोखंडी संरक्षक पाइप पुराच्या वेगवान (Pune Gramin) पाण्यात वाहून गेले. नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, सिंचनासाठीचे पाइप तसेच अन्य शेतीसाहित्यही पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील ओढे, नाले आणि पाझर तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
घोडनदीवरील लाखणगाव येथील जुना पूल पाण्याखाली गेल्याने बेल्हा–जेजुरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पारगाव, शिंगवे, लाखणगाव, पिंपळगाव, खडकी, कळंब, चांडोली, काठापूर, निरगुडसर, भराडी, जवळे आणि देवगाव या गावांतील नदीकाठच्या परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. अनेक शेतांमध्ये भाजीपाला, तरकारी पिके, मका तसेच जनावरांसाठीचा हिरवा चारा पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतजमिनींसह सिंचन व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
घोडनदीकाठावरील बंधाऱ्यांवरील संरक्षक पाइप दुरुस्त करण्यात यावेत तसेच महसूल विभागाने (Pune Gramin) पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे माजी सरपंच राजूशेठ ढोबळे ,निवृत्तीशेठ ढोबळे,शिवाजी ढोबळे दत्तात्रय वाव्हळ, संदिप घुले, बाळासाहेब थोरात यांनी केली .
तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून घोड नदीला पूर आला असल्यामुळे नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये तसेच लहान मुलांची काळजी घ्यावी नदीकाठी असलेली घरे व अन्य झोपड्या नागरिकांनी राहू नये . गावातील अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावी रात्री अपरात्री पुराचे पाणी वाढू शकते असे आवाहन पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी केले.






