Alandi Flood News : इंद्रायणीला महापूर..! आळंदीत अडकलेल्या ४०८ वारकऱ्यांची सुरक्षित सुटका, मंदिर परिसरात पाणी
शहरातील विविध धर्मशाळा, दर्शन मंडप आणि इतर ठिकाणी अडकलेल्या वारकरी आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून बचावकार्य अद्याप सुरू आहे.

Alandi Flood News : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी ६ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट जारी केल्यानंतर देहू-आळंदी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
या सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आळंदी शहरात पूरसदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक यंत्रणा युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, शहरातील विविध धर्मशाळा, दर्शन मंडप आणि इतर ठिकाणी अडकलेल्या वारकरी आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून बचावकार्य अद्याप सुरू आहे. (Alandi Flood News)
बचाव पथकांनी अहोरात्र परिश्रम करत मुख्य ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरी भागातून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा परिसरातून २८ अशा एकूण ४०८ भाविकांची सुखरूप सुटका केली.
नागरिकांच्या आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने इंद्रायणी नदीवरील चार महत्त्वाचे पूल तात्पुरते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. तसेच नदीकाठ, नदीपात्र आणि पुलांवर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. (Alandi Flood News)
Alandi Flood News : इंद्रायणीला महापूर..! आळंदीत अडकलेल्या ४०८ वारकऱ्यांची सुरक्षित सुटका, मंदिर परिसरात पाणी
बंदिस्त किंवा धोकादायक भागातून जाण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे आळंदीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वारीसाठी महिलांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले दोन चेंजिंग रूम पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर दर्शन मंडपातील दर्शन बारीदेखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. (Alandi Flood News)
जुन्या आणि नवीन पुलांवरील संरक्षण कठडे तसेच त्यावर बसविण्यात आलेली लोखंडी जाळीही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या पश्चिम बाजूला असलेल्या शनी मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेते आणि इतर दुकानदारांच्या दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांचे साहित्य भिजून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. पूरामुळे शहरातील अनेक महत्त्वाचे मार्गही बंद झाले आहेत.
ज्ञानेश्वर मंदिराला जोडणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. देहू फाटा-चाकण मार्गावरील गरुड स्तंभाजवळील पूलही जलमय झाला आहे. आळंदी नगरपरिषद चौक ते देहू फाटा जोडणारे जुने आणि नवीन दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.





