Pune RTO – वाहतूक विषयी गुन्ह्यांमध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या वर्षी ३ हजार ६०० वाहन परवाने निलंबित केले आहेत. यात सिग्नल तोडणे, ठरवून दिलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. शिवाय परवाना निलंबित झालेला वाहनचालक पुन्हा वाहन चालविताना पुन्हा आढळल्यास त्याला ५ हजारांचा दंड केला जाणार असल्याचे आरटीओने सांगितले आहे. वाहतूक शाखेचे पोलिस, महामार्ग पोलीस आणि अन्य राज्यांतील आरटीओने पाठविलेल्या अहवालानंतर ही कारवाई झाली आहे. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व सुरक्षित रस्ते प्रवासासाठी पुणे ‘आरटीओ’ने मोटार अधिनियम वाहन १९८८ कलम १९ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहन परवाना निलंबनाची कारवाई केली आहे. पुणे वाहतूक पोलिसांकडून आणखी सुमारे ३ हजार वाहन परवाने निलंबित करण्याचा अहवाल आरटीओला मिळणार आहे. या वेळी बोलताना पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले म्हणाले, मागील वर्षात झालेल्या निलंबनानंतर येत्या दिवसांत आणखी काही परवाने निलंबित केले जातील. रस्ते सुरक्षा हा आमचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून, जे चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर सातत्याने कारवाई केली जाईल. या कारवाई झालेल्या चालकांनी विहित मयदिपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, लाल सिग्नल ओलांडून जाणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, दारू अथवा अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे इत्यादी गुन्हे केले होते.जर तुमचा परवाना निलंबित झाल्यानंतर तुमच्याकडे असला तरी त्याचे कायदेशीर अस्तित्व शून्य राहते. परवाना निलंबित झाल्यास त्याची माहिती आरटीओतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर टाकली जाते. त्यामुळे जर गाडी चालवताना या परवान्याचा पडताळा केला असता त्याची स्थिती निलंबित अशी दर्शवली जाते. त्यामुळे तो चालक विनापरवाना वाहन चालक ठरतो त्यामुळे त्याच्यावर ५ हजार रुपये दंडाची कारवाई केली जाऊ शकते. जर परवाना निलंबित झालेल्या चालकाच्या वाहनास अपघात झाल्यास त्याचा विमा ग्राह्य धरला जात नाही.