Pune: श्रीराम नवमीनिमित्त बाजीराव रोड, लष्कर भागात मिरवणूका निघतात. त्यामुळे उद्या गुरूवारी (दि.२६) या भागातील वाहतुकीत दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजेच मिरवणूका संपेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे. पहा असा असेल वाहतूक बदल.. बाजीराव रस्त्यावरील वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यावेळी वाहनचालकांनी पुरम चौकातून डावीकडे वळून टिळक रस्ताने, अलका टॉकीज चौक, खंडोजीबाबा चौकातून पुढे जावे. तसेच लष्कर परिसरातील देखील वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाय जंक्शनवरून एमजी रोडकडे जाणारी वाहतूक ही वाय जंक्शन येथे बंद करण्यात येणार आहे. मिरवणूका ट्रायलक हॉटेलपासून पुढे १५ ऑगस्ट चौकाच्या पुढे गेल्यानंतर एम.जी रस्त्यावरील वाहतूक १५ ऑगस्ट चौकापासून उजवीकडे व डावीकडे वळविण्यात येणार आहे. महंमद रफी चौकाच्यापुढे मिरवणूका गेल्यानंतर एम.जी रस्त्यावरील वाहतूक महंमदरफी चौकापासून उजवीकडे ईस्ट स्ट्रीट रोकडकडे वळविण्यात येणार आहे. तसेच या चौकातून मिरवणूका पुढे गेल्या की कोहीनूर हॉटेलपासून एम.जी रोडवर येणारी वाहतूक बंद करून ती भोपळा चौक येथून कुरेशी मस्जिद तसेच सेंटर स्ट्रीट मार्गावर वळविली जाईल. तर होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक ही मिरवणूकीच्या मार्गानुसार बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक सरळ पुढे ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे.