Pune : हद्दीच्या वादातील रस्त्यांची खड्ड्यांपासून मुक्ती

पुणे – पावसाळ्यात हद्दीच्या वादात खड्ड्यात जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आता स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली जाणार आहे. ही पथके पावसाळ्याच्या चार महिन्यांत पथ विभागाच्या अंतर्गत काम करणार आहेत. त्यामुळे आता १२ मीटर रुंदीच्या खालील रस्तेही पावसाळ्यात वेळोवेळी दुरुस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा प्रस्ताव पथ विभागाकडून आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
काय आहे हद्दीचा वाद ?
शहरात सहा मीटर ते ४५ मीटरपर्यंत वेगवेगळ्या रुंदीचे सुमारे २ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती नियमित, तसेच योग्य पद्धतीने होण्यासाठी १२ मीटर रुंदीच्या आतील सर्व रस्ते क्षेत्रीय कार्यालयाकडे देखभाल दुरुस्तीसाठी दिले आहेत, तर त्यावरील रस्त्यांची जबाबदारी पथ विभागाकडे आहे. पथ विभागाच्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला हाॅटमिक्सचा प्रकल्प आहे. त्यामुळे मुख्य खात्याकडून त्यांना हवे त्या वेळी हाॅटमिक्स घेऊन रस्ते दुरुस्ती होते.
मात्र, क्षेत्रीय कार्यालयाकडून त्यांच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अंतर्गत रस्त्यावर नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. क्षेत्रीय कार्यालयांना खर्चास मर्यादा असल्याने त्यांना निविदा काढून ठेकेदार नेमून ही दुरुस्ती करण्यासाठी मर्यादा येतात. परिणामी छोटे रस्ते पावसाळ्यात खड्ड्यात असतात. नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, हद्दीचे कारण देत हे दोन्ही विभाग या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात.
आता स्वतंत्र पथके
महापालिकेच्या पथ विभागाकडून शहरातील रस्त्यांचे झोन केले आहेत. त्यानुसार दुरुस्तीसाठी नेमलेली पथके १२ मीटरच्या आतील रस्त्यांची दुरुस्ती करत नाहीत. त्यामुळे आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाचे २ कनिष्ठ अभियंते आणि एक उपअभियंत्यांचे पथक नेमले जाईल. हे अभियंते त्यांचे काम सांभाळून रस्ते दुरुस्तीसाठी पथ विभागासोबत काम करतील. त्यानुसार पथ विभाग हाॅटमिक्स आणि रस्ते दुरुस्तीची साधने उपलब्ध करून देणार असून, खड्डे दुरुस्तीची जबाबदारी पथकावर असेल.
‘प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाचे २ कनिष्ठ अभियंते आणि एक उपअभियंत्यांचे पथक नेमण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. परिणामी संपूर्ण शहरातील रस्ते दुरुस्तीचे काम मुख्य खात्यामार्फतच होईल; पण त्याची जबाबदारी स्थानिक पातळीवरील पथकावर राहील.’ – अनिरुद्ध पावसकर ( पथ विभाग प्रमुख )





