Pune : रस्त्याचे काम दोन वर्षांपासून अपूर्ण

वडगावशेरी –वडगावशेरी व खराडी या दोन गावांच्या मध्ये असलेल्या जुना मुंढवा-चंदननगर रस्त्याचे सुंदराबाई शाळा ते साईनाथनगर यादरम्यान केलेले सिमेंट कॉंक्रिटीकरण दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे काम त्वरीत पूर्ण करा अन्यथा उपोषण करू, असा इशारा वडगावशेरी नागरिक मंचचे अध्यक्ष आशिष माने यांनी दिला आहे.
पुणे महानगरपालिका आयुक्त व पथ विभाग खाते प्रमुखांना यासंदर्भात माने यांनी लेखी निवेदन दिले आहे.
मुंढवा येथून वडगावशेरी व चंदननगर येथे जाण्यासाठी फार वर्षांपासून एक रस्ता आहे, त्यालाच जुना मुंढवा-चंदननगर रोड असे म्हटले जाते. या रस्त्याचे काम लॉकडाऊनच्या अगोदर सुरू झाले होते. हा संपूर्ण रस्ता सिमेंटकॉंक्रीटचा करण्यात येणार होता. परंतु, या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच अपुऱ्या कामांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर अनेक गृहप्रकल्प झाले आहेत. दाट लोकवस्तीचा परिसर आहे. तरी रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.





