Pune Road Safety: रस्त्यावर चिखल, पुणेकर घसरले! महापालिकेच्या नोटीसला बिल्डरकडून केराची टोपली
Pune Road Safety: अवजड वाहनांमधून चिखल सांडल्याने जुना आरटीओ चौक बनला मृत्यूचा सापळा; गेल्या तीन-चार दिवसांपासून घडत आहेत दुर्घटना.

Pune Road Safety – बांधकामाच्या खोदाईचा राडारोडा घेवून जाणाऱ्या अवजड वाहनांतून जुना आरटीओ ते नायडू रुग्णालय या रस्त्यावर चिखल पडत असल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. मंगळवारी आणि बुधवारी मोठ्या प्रमाणात वाहने घसरून पडली, या दुर्घटनेनंतर महापालिकेने या ठिकाणी काम सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिक तसेच वास्तुविशारदला नोटीस बजावली परंतु, त्यानंतरही गुरूवारी सकाळी पुन्हा तोच प्रकार घडला.
अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले, बांधकाम व्यावसायिक महापालिकेच्या नोटीसलाही जुमानत नसल्याचे यातून उघड झाले आहे. महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून मी. बिर्ला इस्टेट प्रा. लि. आणि वास्तूविशारद दिनेश चंद्रात्रे यांना महापालिकेने या सर्व प्रकारावर बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या मिळकतीवर आपल्या कंपनीकडून नव्याने इमरतीचे काम सुरू आहे. सदर बांधकामाला लागणारे विविध साहित्य आणि मुख्यतः रेडी-मिक्स कॉन्क्रीट इत्यादींची ने-आण सुरू असते.
सदरहू साहित्य ने-आण करत असताना बऱ्याच वेळा ते पुणे आरटीओ ऑफिसच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर आणि आरटीओ चौकात तसेच परिसरातील रस्त्यावर पडत असल्याचे निदर्शनास आले असून त्या अनुषंगाने आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत आहेत, असे या नोटीस मध्ये नमूद करण्यात आले होते. पुढील सात दिवसांत या बाबतचा खुलासा बांधकाम विकास विभागाकडे करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही पुन्हा हा बांधकामांचा चिखल रस्त्यावर आला आहे.




