पुणे – दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले. त्यामुळे बाबा भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीस सोमवारी बंद करण्यात आला. रस्ता बंद झाल्याने नारायण पेठ, अलका चौक आणि ओंकारेश्वर मंदिर परिसरात सायंकाळी सहानंतर वाहतूक कोंडी झाली होती. मेट्रोच्या कामामुळे भिडे पूल मागील काही महिन्यांपासून बंद आहे. यामुळे आजूबाजूच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. यातच रविवारपासून नदीपात्रातील रस्ताही पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली. सोमवारी अग्निशमन दलाने तेथे वाहने, जवान तैनात केले. तेथे क्रेन, इतर साहित्यही ठेवले होते. कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेने अलका चौक, भिडे पुलानजीक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. शाळा, कार्यालये सुटल्यानंतर वाहतूक कोंडीत वाढ झाली होती. स्वारगेट, टिळक रस्ता ही जाम : वाहतूक पोलीस नावालाच दरम्यान नदीपात्रातील रस्ता बंद असल्याचा ताण शिवाजीनगर, डेक्कन आणि टिळक रस्त्यावरही जाणवत होता. सकाळ पासूनच पावसाची रिपरिप असल्याने नागरिक चारचाकी वाहने घेऊनच घरातून बाहेर पडले होते. यामुळे कार्यालय सुटल्यानंतर सर्वत्र कोंडी दिसत होती. स्वारगेट परिसात बस स्थानक, मेट्रो स्थानक, लक्ष्मीनारायण थिएटर, सारसबाग, खडकमाळ अळी आदी भागातही वाहतूक कोंडी झाली होती. याठिकाणी वाहतूक पोलिसांचे नियोजन फिसकटल्याचे दिसत होते