पुणेकरांची दिवाळी जाणार खड्ड्यात! ग्रॅंड सायकल टूरसाठी ७५ किमी रस्त्यांची खोदाई

प्रभात वृत्तसेवा
पुणे : जानेवारीत होणाऱ्या पुणे ग्रॅंड सायकल टूर स्पर्धेसाठी शहरातील ७५ किलोमीटर रस्त्यांवरील विविध विभागाच्या खोदाईची कामे येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे ऐन दिवाळीत शहरातील सर्व प्रमुख रस्ते खोदले जाणार असून पुणेकरांची दिवाळी खड्ड्यात जाणार आहे.विशेष म्हणजे दिवाळीत सर्वाधिक वर्दळ असलेल्या छत्रपती शिवाजी, बाजीराव रस्त्याचाही समावेश असल्याने पुणेकरांनी वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागणार आहे.
पुणे ग्रॅंड सायकल टूर स्पर्धेसाठी दुरुस्ती झालेल्या रस्त्यांवर दहा वर्षे खोदाई करण्यास मनाई असणार आहे. त्यामुळे पोलिसांचा सीसीटीव्ही प्रकल्प, महावितरण, ड्रेनेज, एमएनजीएल तसेच पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक असलेली खोदाई आता पुढील पंधरा दिवसांत पूर्ण करावी लागणार आहे.जानेवारीमध्ये शहर, जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सायकल स्पर्धा होणार आहे. यासाठी उपनगरांसह मध्यवर्ती भागातून स्पर्धक जाणार आहे.
त्यासाठी शहरातील ७५ किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती होणार असून त्यावर तब्बल १२५ कोटी रुपये खर्च होणार आहे. रस्त्यांसाठी १० वर्षांची डीएलपी (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) असेल. रस्ते तयार केल्यानंतर इतरांनी खोदाई केल्यास ठेकेदार त्याची जबाबदारी घेणार नाही. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी सोमवारी सर्व विभागांची बैठक घेतली.ज्यांना खोदाई करायची आहे, त्यांनी अहोरात्र काम करून १५ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.
पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठीची खोदाई, तसेच पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पासाठीच्या केबलच्या कामांबाबत यावेळी आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे टप्प्याटप्प्याने करण्याऐवजी एकाच वेळी केली जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना यात सुधारणा करण्याचे निर्देश दिले.पावसाळा संपल्याने विविध विभागाच्या कामासाठी तसेच समान पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनी कामांसाठी खोदाई होणार आहे. हे खोदकाम स्पर्धेच्या मार्गावरील अनेक रस्त्यांवर असणार आहे.



