Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दिवाळीत विक्रमी वाहतूक; तब्बल ३० हजार ५४३ कार धावल्या

Samruddhi Mahamarg – महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग एरव्ही कायम चर्चेत राहतो तो यावर होणाऱ्या अपघातांमुळे, मात्र हाच समृद्धी महामार्ग आता प्रवशांसाठी मोठे वरदान ठरतो आहे. कारण गेल्या महिन्याभरात म्हणजेच दिवाळीच्या काळात या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांनी विक्रमी संख्या गाठली आहे.
विशेष म्हणजे हा महामार्ग सुरू झाल्यापासून इतक्या मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गावर पहिल्यांदाच कार धावल्या. तसेच या मार्गावर अत्यंत कमी अपघात या काळात झाले आहेत. १ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान या महामार्गावरून २ लाख ६५ हजार ८५६ कार धावल्या होत्या.
तर आता नोव्हेंबर महिन्याच्या १ ते २१ या कालावधी दरम्यान हीच आकडेवारी तब्बल ३ लाख ८२ हजार ४१६ वर गेली आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारची वाहतूक झाली असली तरी, या कालावधीमध्ये अत्यंत कमी अपघात झाले आहेत. तसेच हा महामार्ग सुरू झाल्यापासून आपघातांचीही आकडेवारी आतापर्यंतची सर्वात कमी आहे.
दिवाळीच्या दरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नागपूर ते मुंबई-पुणे आणि परत याच मार्गावर प्रवास करण्यासाठी समृद्धी महामार्गाला पहली पसंती दिली. विशेष बाब म्हणजे १८ नोव्हेंबर या ऐन दिवाळीच्या एकाच दिवशी समृद्धी महामार्गावरून तब्बल ३० हजार ५४३ कार धावल्या. आतापर्यंत एकाच दिवशी कारने गाठलेली ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
चाकरमान्यांची प्रथम पसंती !
दिवाळीच्या दिवसात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची, पर्यटक, प्रवाशांची संख्या ही फार मोठी असते. विशेषत: याच कालावधी मध्ये रेल्वे रिझर्वेशन मिळणे हे देखील मोठे आव्हान असते.
त्यामुळे या दिवाळीत समृद्धी महामार्गाला पर्यटक, प्रवसी आणि चाकरमान्यांनी पहिली पसंती दिली. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर नोव्हेंबर महिन्यात १३ अपघात झाले. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी हे अपघात तुलनेने कमी आहेत.





