खोदकामातून पुणेकरांची नाही सुटका! पोलीस आणि महाप्रीत एकूण १ हजार कि.मी. रस्त्यावर खोदाई करणार

प्रभात वृत्तसेवा
पुणे : पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या भूमिगत केबलसाठी सुरू असलेल्या रस्ते खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची वाट लागलेली असतानाच शहरात आणखी ५०० किलोमीटरची खोदाई केली जाणार आहे. ही खोदाई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पासाठी केली जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी प्रत्येकी ५०० अशी एक हजार खोदाई केली जाणार असल्याने पुणेकरांना पुढील काही वर्षे खोदाईचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.पालिकेकडून शहरासाठी अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासह, संपूर्ण शहराचे ट्वीन मॉडेल करण्यात येणार आहे.
त्यासोबतच शहरात पुन्हा मोफत वायफाय सुविधाही देण्यात येणार आहे. याचे काम पालिकेने राज्यशासनाच्या अधिनस्त महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रीत) या कंपनीस दिले आहे. त्यासाठी कंपनी शहरात ओएफसी केबल टाकणार आहे. गेल्या वर्षी पालिकेने रस्ते दुरुस्त केल्याने या कंपनीस ओव्हरहेड केबल टाकण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर ही केबल पुन्हा भूमिगत केली जाणार आहे. त्यामुळे खोदकामातून नागरिकांची काही सुटका होणार नाही, असे दिसते.
नियोजनाचा विचका..
सीसीटीव्ही आणि महाप्रीतच्या प्रकल्पासाठी प्रत्येकी ५०० किलोमीटरची खोदाई होणारनआङे. ही दुबार खोदाई टाळण्यासाठी पालिकेने प्रकल्प संबंधितांची बैठक घेऊन कोणत्या भागात खोदाई करायची याची माहिती घेतली. यावेळी दोन्ही विभागांची सुमारे १२५ किलोमीटर अंतराची केबल खोदाई एकत्रित करण्याचा निर्णय झाला. ही खोदाई शहरातील मध्यवर्ती भागात होती. मात्र, यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने महाप्रीतने आधीच ओव्हरहेड केबल टाकल्या. पोलिसांनीही स्वतंत्र केबल टाकली. त्यामुळे, आता महाप्रीतला पुन्हा स्वतंत्र खोदाई करून केबल टाकावी लागणार आहे.
महाप्रीतन जुन्या मुंबई–पुणे रस्त्यावरून केबल टाकणार आहे. तेथे खोदाईस परवानगी नसल्याने त्यांनी पालिकेच्या पथदिव्यांवरून केबल टाकली. ही बाब लक्षात आल्यानंतर पालिकेच्या विद्युत विभागाने या रस्त्याचा पदपथ नव्याने केला असून केबल टाकण्यासाठी त्यात डक्टची व्यवस्था आहे, त्यातून केबल टाकावी असे कळविले. मात्र, त्याला उत्तर देत काही महिन्यांनी ही केबल भूमिगत टाकायची आहे, त्यामुळे डक्टमधून टाकता येणार नाही असे पालिकेस कळविण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, केबल खोदाईसाठी रस्ते खोदाई करायला नको म्हणून हे डक्ट टाकले जातात, याची साधी माहितीही या कर्मचाऱ्यांना नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
महाप्रीत सध्या ओव्हरहेड केबल टाकत आहे. प्रकल्पाच्या मान्यतेनुसार ती भूमिगत असणे आवश्यक आहे. आता ओव्हरहेड टाकलेली केबल नंतर भूमिगत केली जाणार आहे. त्यासाठी कंपनीस खोदाई करावी लागणार आहे. मात्र, पोलीस आणि महाप्रीतने युक्त खोदाई का केली नाही, याची माहिती घेतली जाईल.
— पृथ्वीराज बी. पी. (अतिरिक्त आयुक्त)





