पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला पुणेकरांची साद; महापालिकेच्या केंद्रावर ४१० मुर्तीची विक्री

पुणे – गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे या उद्देशाने पर्यावरण विभाग व लिबर्टी अर्थवेअर आर्ट यांच्या मदतीने शाडू माती तसेच संगम मातीच्या मूर्ती विक्रीचा मूर्ती आमची, किमंत तुमची हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात दोन दिवसांत पुणेकरांनी २१० शाडूच्या मूर्ती तर २०० संगम मातीच्या (लाल माती) मूर्ती घेतल्या आहेत. महापालिकेकडून कोणतीही जाहीरात अथवा जनजागृती न करताच गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी हा उपक्रम हाती घेतला असताना त्याला ४०० पेक्षा अधिक पुणेकरांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे भविष्यात हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून सांगण्यात आले.
आपल्या घरी गणपती बसविताना नैसर्गिक साहित्य, जैवविघटनशील व पर्यावरणास अनुकूल साहित्य वापरून मूर्तीची सजावट करण्यात यावी व पीओपीची मूर्ती न वापरता नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे या उद्देशाने घोले रोड आर्ट गॅलरी येथे हा उपक्रम राबविण्यात आला होता. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही अवघ्या दोन तासांत पाण्यात विरघळतात व विसर्जन केल्यानंतरचे पाणी घरगुती कुंडीमध्ये वापरता येते. सुमारे एक फूटा पर्यंतच्या आकाराच्या या मूर्ती होत्या.





